लाईफ सर्टिफिकेट अपडेटच्या नावाने 26 लाखांची फसवणुक

रेल्वेच्या ज्युनिअर इंजिनिअरला गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 नोव्हेंबर 2025
मुंबई, – बँकेचा अधिकृत प्रतिनिधी बोलत असल्याची बतावणी करुन लाईफ अपडेट सर्टिफिकेट कॅन्सल झाली असून अपडेट व्हेरीफिशनच्या नावाने रेल्वेच्या एका वयोवृद्ध ज्युनिअर इंजिनिअरची अज्ञात सायबर ठगाने सुमारे 26 लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार मुंबई सेंट्रल परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मध्य सायबर प्रादेशिक विभागाने फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या सायबर ठगांचा शोध सुरु केला आहे. एक तासांत या ठगाने त्यांच्या बँक खात्यातून ही रक्कम काढल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

81 वर्षाचे वयोवृद्ध तक्रारदार अरविंदकुमार प्रसाद सिन्हा हे मुंबई सेंट्रल येथे राहतात. नॉर्थ रेल्वे विभागातून ते ज्युनिअर इंजिनिअर म्हणून निवृत्त झाले आहे. 12 नोव्हेंबरला ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो त्यांच्या बँकेच्या लाईफ अपडेट सर्टिफिकेट विभागातून बोलत असल्याचे सांगितले. काही वेळानंतर त्याच व्यक्तीने त्यांना व्हिडीओ कॉल केला होता. त्याने बँकेचा अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवून तुमची लाईफ अपडेट सर्टिफिकेट कॅन्सल झाली आहे.

ही सर्टिफिटकेट व्हेरीफिकेशन करण्याचा बहाणा करुन त्याने त्यांचे डेबीट कार्ड आणि पीन टाकण्यास सांगितले. यावेळी त्यांनी डेबीट कार्डसह पीन देण्यास नकार दिला होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्याचा मोबाईल बंद करुन स्विच ऑफ केला होता. एक तासानंतर त्यांनी मोबाईल ऑन केला असता त्यांना बँकेतून काही मॅसेज आल्याचे दिसून आले. त्यांच्या खात्यातून अज्ञात व्यक्तीने आठ ऑनलाईन व्यवहार करुन सुमारे 26 लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते.

हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर हेल्पलाईनवर तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांनी मध्य सायबर प्रादेशिक विभागात या तक्रारीची प्रत देऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या जबानीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ज्या आठ बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या बँक खात्यासह खातेदाराची माहिती काढली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page