नाकोडा ज्वेलर्स दुकानातील चोरीचा पर्दाफाश करुन चौघांना अटक
खरेदीचा बहाणा करुन 40 लाखांचे सोनसाखळी पळविल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 नोव्हेंबर 2025
मुंबई, – वांद्रे येथील नाकोडा ज्वेलर्स दुकानात सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा बहाणा करुन तीनजणांच्या एका टोळीने सुमारे 40 लाखांचे सोनसाखळी असलेले फोल्डर चोरी करुन पलायन केले होते. याप्रंकरणी गुन्हा दाखल होताच अवघ्या बारा तासांत या चोरीचा निर्मलनगर पोलिसांनी पर्दाफाश करुन एका महिलेसह चौघांना शिताफीने अटक केली. श्रावण हरिद्वार नाविक, सोनाली सुरेंद्रसिंग यादव,फजील नासीर परमार आणि अमान उस्मान शेख अशी या चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 32 लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे. उर्वरित दागिने लवकरच हस्तगत केले जाणार आहे. अटकेनंतर चारही आरोपींना वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
यातील तक्रारदार ज्वेलर्स व्यापारी असून त्यांच्या मालकीचे निर्मलगर हद्दीत एक ज्वेलर्स दुकान आहे. रविवारी सकाळी नऊ वाजता ते त्यांच्या दुकानात होते. याच दरम्यान त्यांच्या दुकानात एका महिलेसह दोनजण आले होते. या दोघांनी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा बहाणा करुन काही दागिन्यांची पाहणी करण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान तिथे आणखीन एक तरुण आला. दागिने पाहत असताना ही महिला सतत पिण्यासाठी पाणी मागत होती. त्यामुळे त्यांनी तिला पाणी आणून दिले होते. ही महिला प्रत्येक चैन घालून पाहत असल्याने त्यांनी तिच्यासमोरच 25 सोनसाखळी असलेले फोल्डर ठेवून दिले होते. यावेळी नंतर आलेल्या तरुणाने सुमारे 40 लाख रुपयांचे सोनसाखळी असलेले फोल्डर चोरी करुन पलायन केले होते.
हा प्रकार लक्षात येताच तक्रारदार ज्वेलर्स व्यापारी त्याच्या मागावर गेले, मात्र तो त्याच्या बाईकवरुन पळून गेला होता. त्यांनी आरडाओरड करुन त्याला इतर लोकांच्या मदतीने पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो बाईकवरुन पळून जाण्यात यशस्वी झाला होता. याच दरम्यान दुकानात आलेली महिला आणि तिचा सहकारी गायब झाले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी तिन्ही आरोपीविरुद्ध निर्मलनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तिघांविरुद्ध चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करुन तपास सुरु केला होता. दुकानासह परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त मनिष कलवानिया, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भोयर, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बनकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयेश फाटक, पोलीस हवालदार अमोल पवार, शेख, विश्वास सावंत, पोलीस शिपाई सागर राठोड, प्रणव तायडे, सागर गायकवाड यांनी पळून गेलेल्या श्रावण नाविक, सोनाली यादव आणि फजील परमार या तिघांना अवघ्या बारा तासांत अटक केली.
चौकशीत त्यांना अमान शेख याने मदत केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनीच सोने खरेदी करण्याचा बहाणा करुन चोरीची योजना बनविल्याची कबुली दिली होती. त्यांच्याकडून 40 लाखांपैकी 32 लाखांचे पंधरा ते वीस ग्रॅम वजनाचे अठराहून अधिक सोनसाखळी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर या चारही आरोपींना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या चौघांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांच्याकडून उर्वरित सोन्याची चैन लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.