राजकीय नेत्याच्या पत्नीला आक्षेपार्ह टिपणी पाठविणे महागात पडले
छत्रपती संभाजीनगर येथून आरोपीस अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
30 नोव्हेंबर 2025
मुंबई, – राज्यातील एका प्रमुख राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याच्या पत्नीवर सोशल मिडीयावर आक्षेपार्ह टिपणी केल्याप्रकरणी एका मुख्य आरोपीस छत्रपती संभाजीनगर येथून गुन्हे शााखेच्या अधिकार्यांनी अटक केली. किरण सिताराम जाधव असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. किरणला एका नेत्याच्या पत्नीला अश्लील टिपनी पाठविणे चांगलेच महागात पडल्याचे बोलले जाते.
यातील तक्रारदार महिला राज्यातील प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्याची पत्नी आहे. तिचे सोशल मिडीयावर काही अकाऊंट आहे. याच अकाऊंटवर अज्ञात व्यक्तीने काही आक्षेपार्ह टिपनी केलेले मॅसेज पाठविले होते. ही पोस्ट त्याने मै नास्किक किरण जाधव या फेसबुक प्रोफाईलवरुन पाठविले होते. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र त्याच्याकडून अशाच प्रकारे सतत आक्षेपार्ह टिपनी पाठविले होते. त्यामुळे संबंधित नेत्यासह त्यांची पत्नी आणि कुटुबियांची नाहक बदनामी होत होती. हा प्रकार तिने तिच्या पतीला सांगून पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तिच्या तक्रार अर्जावरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच त्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. हा तपास हाती येताच युनिट एकच्या अधिकार्यांनी संबंधित आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन छत्रपती संभाजीनगर येथून किरण जाधवला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच संबंधित आक्षेपार्ह टिपनी केल्याचे उघडकीस आले होते. त्याच्या आक्षेपार्ह टिपनीमुळे या राजकीय नेत्यासह त्याची पत्नी आणि कुटुंबियांची नाहक बदनामी झाली होती. त्यांच्या सामाजिक आणि वैयक्तितरीत्या अपमान झाला होता. त्यामुळे त्याच्यावर अटकेची कारवाई करुन त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते.
याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला एक डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला असून या मोबाईलवरुन त्याने संबंधित आक्षेपार्ह टिपनी केल्याचे उघडकीस आले आहे. जप्त केलेला मोबाईल फॉरेनिसक लॅबमध्ये पाठविण्यात आला आहे. या कृत्यामागे त्याचा काय उद्देश होता, त्याने कोणाच्या सांगण्यावरुन ते आक्षेपार्ह टिपनी केल्या होत्या का, त्याचे कुठल्या राजकीय पक्षाशी संबंध आहे का, त्याने अशाच प्रकारे आक्षेपार्ह टिपनी इतर कोणत्या नेत्यांविषयी केली किंवा पोस्ट केली आहे का याचा पोलीस तपास करत आहे.