72 लाखांच्या कोकेनसह नायजेरीयन नागरिकाला अटक

मालवणीतील मनोज देसाई गार्डनजवळ पोलिसांची कारवाई

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 डिसेंबर 2025
मुंबई, – मालाडच्या मालवणीतील मनोज देसाई गार्डनजवळ परिसरातून कोकेनसह एका नायजेरीयन नागरिकाला मालवणी पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. मोनाची अगवू ऊर्फ ओलीवर जे अगवू असे या नायजेरीयन नागरिकाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी सुमारे 72 लाखांचा 180 ग्रॅम वजनाचा कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने सोमवार 8 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मालवणी पोलीस ठाण्यातील गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी गुरुवारी सायंकाळी परिसरात पेट्रोलिंग करत होते. याच दरम्यान काही विदेशी नागरिक मनोज देसाई गार्डनजवळ ड्रग्जची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप जाधव, पोलीस निरीक्षक जीवन भातकुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डॉ. दिपक हिंडे, पोलीस हवालदार अनिल पाटील, पोलीस शिपाई साजिद शेख, मुद्दसीर देसाई, समीर सोरटे, कालिदास खड्डे यांनी मनोज देसाई गार्डनजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती.

गुरुवारी रात्री तिथे मोनाची अगवू आला होता, त्याची हालचाल संशयास्पद वाटताच या पथकाने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना 180 ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 72 लाख रुपये इतकी आहे. तपासात तो नायजेरीयन नागरिक असून गेल्या काही वर्षांपासून मुंबई शहरात वास्तव्यास होता. मालवणी परिसरात तो कोकेन विक्रीसाठी आला होता, मात्र कोकेनची विक्री करण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली.

त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा करुन नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या गुन्ह्यांत त्याचे इतर कोणी सहकारी आहेत का, त्याने यापूर्वीही ड्रग्जची विक्री केली आहे याचा पोलीस तपास करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page