पोलीस असल्याची बतावणी करुन लुटमार करणार्या त्रिकुटास अटक
आरोपींकडून गुन्ह्यांतील शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात यश
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 डिसेंबर 2025
मुंबई, – पोलीस असल्याची बतावणी करुन एका 71 वर्षांच्या वयोवृद्ध व्यापार्याला बोलण्यात गुंतवून लुटमार करुन पळून गेलेल्या त्रिकुटाला काही तासांत मुलुंड पोलिसांनी अटक केली. तौफिक मोफिद सिद्धीकी, सिमोन ग्रॉबिअल गोन्साविल्स आणि मोहम्मद शरीफ मुनीर अहमद सिद्धीकी अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांकडून गुन्ह्यांतील सव्वादोन लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. अटकेनंतर या तिघांनाही मुलुंड येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
किरीट भिखालाल शाह हे 71 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार व्यापारी असून मुलुंडच्या मिरागोविंद सोसायटीमध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. मंगळवारी 2 डिसेंबरला दुपारी पावणेचार वाजता ते मुलुंडच्या जटाशंकर डोसा रोड, अतिथी हॉटेलजवळ त्यांच्या वैयक्तिक कामासाठी आले होते. यावेळी तिथे आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी ते तिघेही पोलीस असल्याचे सांगून त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले होते. त्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याची चैन, एक गणपतीसह र्य आकाराचे पेंडंट, दोन अंगठी असा सव्वादोन लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले होते. या घटनेनंतर किरीट शाह यांनी मुलुंड पोलिसांना हा प्रकार सांगून तिन्ही तोतया पोलिसाविरुद्ध तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेचे आदेश मुलुंड पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील, पोलीस उपायुक्त राकेश ओला, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन खाडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल करांडे, पोलीस उपनिरीक्षक अक्षय ताटे, पोलीस शिपाई संदीप आव्हाड, संतोष चाकणकर, गणेश कट्टे, विलास बेनके, रमेश ढेबे, प्रदीप पवार, रोहित बच्छेराव, महिला पोलीस शिपाई रुपाली हाडवळे यांनी तपास सुरु केला होता.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या पथकाने मिरारोड येथून तौफिक, वसई येथून सिमोन तर मोहम्मद शरीफ याला धारावीतून पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यांतील शंभर टक्के सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. यातील तौफिकला अशाच एका गुन्ह्यांत मरिनड्राईव्ह पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या जामिनावर होता. अटकेनंतर या तिघांनाही मुलुंड येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना शनिवार 6 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.