शुद्ध सोन्याचा अपहार करुन दोन व्यापार्‍यांची फसवणुक

1.15 कोटीच्या फसवणुकीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 डिसेंबर 2025
मुंबई, – पायधुनी आणि झव्हेरी बाजार येथील दोन वेगवेगळ्या घटनेत शुद्ध सोन्याचा अपहार करुन दोन व्यापार्‍यांची 1 कोटी 15 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एल. टी मार्ग पोलिसांनी अमरदिप रामबहादूर पटवा आणि राजू मथुर मंडल या दोघांविरुद्ध दोन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. दोन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे.

सिमंता भोलानाथ घोराई हे भाईंदर परिसरात राहत असून त्यांचा सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. पायधुनीतील तांबाकाटा, मुंबादेवी परिसरात त्यांच्या मालकीचा एक कारखाना आहे. जुलै 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत त्यांनी त्यांच्या परिचित कारागिर अमरदिप पटवा याला विविध सोन्याचे दागिने बनविण्यासाठी शुद्ध सोने दिले होते. त्यापैकी काही दागिने त्यांनी त्यांना बनवून दिले, मात्र 256 ग्रॅम वजनाचे 30 लाखांचे सोन्याचे दागिने किंवा शुद्ध सोने परत केले नाही. वारंवार विचारणा करुनही त्याने त्यांना प्रतिसाद दिला नव्हता.

दुसर्‍या गुन्ह्यांतील 34 वर्षांचे तक्रारदार प्रसन्नीजीत कार्तिक दोशी जोशी हे ज्वेलर्स व्यापारी असून ते झव्हेरी बाजार परिसरात राहतात. याच परिसरात त्यांचे एक ज्वेलर्स शॉप आहे. राजू मंडल हा त्यांच्या परिचित असून ते त्याच्याकडून सोन्याचे दागिने बनवून घेत होते. जानेवारी 2021 ते डिसेंबर 2025 या कालावधीत त्यांनी त्याला 85 लाख रुपयांचे 650 ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने दिले होते. मात्र त्याने शुद्ध सोने किंवा सोन्याचे दागिने बनवून न देता त्यांची फसवणुक केली होती. त्यांच्याकडील सोने घेऊन पळून गेला होता. 4 डिसेंबरला हा प्रकार त्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याचा ंसंपर्क होऊ शकला नाही. त्याचा मोबाईल बंद येत होता.

या दोन्ही घटनेनंतर सिंमता घोराई आणि प्रसन्नजीत दोशी यांनी एल. टी मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अमरदिप पटवा आणि राजू मंडल या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी दोन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहे. ते दोघेही मूळचे बिहार आणि कोलकाताचे रहिवाशी आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची एक टिम लवकरच त्यांच्या बिहार आणि कोलकाता येथील गावी जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page