हनी ट्रपद्वारे जाळ्यात अडकावून व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी

ब्लॅकमेलसह खंडणीसाठी धमकाविणार्‍या मैत्रिणीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 जानेवारी 2026
मुंबई, – हनी ट्रपद्वारे जाळ्यात अडकावून एका हॉटेल व्यावसायिकाला त्यांच्याच परिचित मैत्रिणीने दोन कोटीच्या खंडणीसाठी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पूनम नावाच्या मैत्रिणीविरुद्ध पार्कसाईट पोलिसांनी ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हॉटेल व्यावसायिकाने तिच्याविरुद्ध तक्रार केल्याचे समजताच तिने त्यांच्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह मानसिक व शारीरिक शोषण केल्याची तक्रार केली होती. विशेष म्हणजे तिने त्यांच्याकडून आतापर्यंत 22 लाखांची खंडणी वसुली केली असून ती दोन कोटीसह महिन्यांला एक लाखांसाठी धमकावत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

58 वर्षांचे तक्रारदार हॉटेल व्यावसायिक असून ते घाटकोपर येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. याच परिसरात त्यांच्या मालकीचे एक बार अ‍ॅण्ड रेस्ट्रॉरंट आहे. तीन वर्षांपूर्वी याच रेस्ट्रॉरंटमध्ये पूनम ही तिच्या एका मैत्रिणीसोबत आली होती. तिथेच त्यांची ओळख झाली होती. तेव्हापासून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. पूनमने तिच्या नातेवाईकाचे कल्याण येथे एक बार आहे. ते बार त्यांना चालविण्यासाठी द्यायचे आहे, त्यामुळे तिने त्यांना ते बार चालविण्यासाठी घेण्याची विनंती केली होती. याच बारसंदर्भात त्यांच्यात अनेकदा मोबाईलवर संभाषण तसेच व्हॉटअपवर चॅटींग सुरु होते. या चॅटदरम्यान त्यांनी ते त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत असून त्यांना तिच्यात काहीही रस नसल्याची आधीच कल्पना दिली होती.

याच दरम्यान तिच्या मैत्रिणीने तिला फोन करुन पूनमला तातडीने कॉल करा. ती आत्महत्या करणार आहे असे सांगितले. त्यामुळे त्यांनी तिला कॉल करुन तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते दोघेही पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले होते. अनेकदा घरी गेल्यानंतर पूनम त्यांच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती. तिचा घटस्फोट झाला असून तिला दोन मुले आहे असे सांगून त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे त्यांनी तिच्याशी अंतर ठेवण्यास सुरुवात केली. तरीही ती वेगवेगळ्या मोबाईलवरुन त्यांना मॅसेज करुन घरी बोलवत होती.

काही दिवसांनी ते तिच्या घरी गेले होते. यावेळी तिने त्यांना तिच्याशी शारीरीक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केले होते. अनेकदा ती पवईतील एका हॉटेलमध्ये स्वतहून रुम बुक करुन त्यांना तिथे बोलावून त्यांना शारीरिक संंबंध ठेवण्यास जबदस्ती करत होती. याच दरम्यान तिने कौटुंबिक कारण सांगून त्यांच्याकडे पैसे घेण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे ते तिला आर्थिक मदत करत होती. याच दरम्यान पूनम ही तिच्या पती, सासू-सासरे आणि दोन्ही मुलांसोबत त्यांच्या घाटकोपर येथील रेस्ट्रॉरंटमध्ये आली होती. यावेळी तिला तिचा घटस्फोट झाला नसल्याचे समजले. याबाबत त्यांनी तिला विचारणा केली असता तिने त्यांच्यात म्युचअल अंडरस्टॅडिंग असल्याचे सांगून विषय टाळण्याचा प्रयत्न केला होता.

ऑक्टोंबर 2023 रोजी तिने त्यांना कॉल करुन ती गरोदर असल्याचे सांगून त्यांच्याकडे दहा लाखांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी तिला दहा लाख रुपये दिले होते. याच दरम्यानही त्यांच्यात अनेकदा शारीरिक संबंध आले होते. सर्व काही ठिक सुरु असताना तिने तिची जूनमध्ये डिलीव्हरी होणार आहे. ती मुलाला जन्म देणार आहे. तिच्यासह तिच्या मुलाचा सर्व खर्च त्यांनी करावा. त्यांनी तसे केले नाहीतर तिने त्यांची बदनामीची धमकी देण्यास सुरुवात केली होती. सप्टेंंबर ते डिसेंबर 2024 या कालावधी त्यांनी तिला 22 लाख रुपये दिले होते. तरीही ती त्यांना सतत ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी देत होती.

या धमकीमुळे ते प्रचंड मानसिक तणावात होते. सततच्या पैशांच्या धमकीला कंटाळून त्यांनी वन टाईम सेटलमेंट करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी तिने त्यांच्याकडे वन टाईम सेटलमेंट करण्यासाठी दोन कोटीसह महिन्याला एक लाख रुपये देण्याची मागणी केली होती. ही रक्कम दिली नाहीतर त्यांच्याविरुद्ध तिच्याकडे भक्कम पुरावे आहेत, त्यांच्यावर लैगिंक अत्याचारासह मानसिक व शारीरिक शोषण करण्याची तक्रार करण्याची धमकी दिली होती. हा प्रकार त्यांनी त्यांच्या मैत्रिणीला सांगितला.

तिने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ती दोन कोटीवर ठाम होती. पैसे दिले नाहीतर त्याची समाजात बदनामी करुन पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली होती. या प्रकारानंतर त्यांनी 10 डिसेंबरला पूनमविरुद्ध पार्कसाईट पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची माहिती मिळतच तिने त्यांच्याविरुद्ध लैगिंक अत्याचाराची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच त्यांनी तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांनीच तिच्याविरुद्ध ब्लॅकमेलसह खंडणीसाठी धमकी दिल्याचा तक्रार केल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांचीही पोलिसांनी जबानी नोंदवून पूनमविरुद्ध ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकाविणे, खोटी तक्रार करुन समाजात बदनामी करण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच गुन्ह्यांत पूनमची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. पूनमने अशाच प्रकारे हनी ट्रपद्वारे स्वतच्या जाळ्यात अडकावून इतरांना ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी दिली आहे का याचा पोलीस तपास करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page