लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या गुन्ह्यांची धमकी देऊन खंडणीची मागणी
दोन गुन्हे दाखल करुन तिसर्या तक्रारीसाठी 8.63 लाखांची खंडणी वसुली
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 जानेवारी 2026
मुंबई, – लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या गुन्ह्यांची धमकी देऊन एका रिक्षाचालकाकडे पाचजणांच्या टोळीने खंडणीची मागणी केल्याचा प्रकार मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या टोळीने रिक्षाचालकाच्या मुलांविरुद्ध दोन गुन्हे दाखल केले असून तिसर्या गुन्ह्यांची धमकी देऊन आतापर्यंत 8 लाख 63 हजाराची खंडणी वसुली केली आहे. सततच्या खंडणीसाठी येणार्या धमकावून त्यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील पाचजणांविरुद्ध मालवणी पोलिसांनी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा करुन अजीज कादर शेख ऊर्फ अज्जू या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यांत चौघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यात झाकीर हुसैन सफदरअली सैय्यद ऊर्फ झाकीर, डॉटकॉम, झोनबबानो जाकीर सैय्यद आणि नुसरत जाकीर सैय्यद यांचा समावेश आहे. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
यातील तक्रारदार रिक्षाचालक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाडच्या मालवणी परिसरात राहतात. याच परिसरात पाचही आरोपी राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यांत या आरोपींनी संगनमत करुन त्यांच्या मुलाच्या विरोधात मालवणी पोलिसांत एका अल्पयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप करुन तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्या मुलाविरुद्ध मालवणी पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. यावेळी आरोपींनी तक्रारदारांना भेटून त्यांच्या मुलाविरुद्ध आणखीन काही तक्रार करण्याची धमकी देऊन त्यांनी एका ज्वेलर्स दुकानात गहाण ठेवलेले सोने सोडवून देण्याची तसेच त्यांना पाच लाख रुपये देण्याची धमकी दिली होती.
मात्र त्यांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिलाद होता. त्याचा राग आल्याने त्यांनी त्यांच्या मुलासह मुलीच्या विरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात अशीच दुसरी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्या मुलासह मुलीविरुद्ध नालासोपारा पोलिसांनी दुसर्या लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी नयानगर येथे तिसरी तक्रार करणार असल्याचे सांगून त्यांना पुन्हा खंडणीसाठी धमकी देण्यास सुरुवात केली होती. या धमकीनंतर त्यांनी ज्वेलर्सकडील गहाण ठेवलेले सर्व सोने सोडवून दिले, तसेच त्यांना पाच लाख रुपये दिले होते.
अशा प्रकारे त्यांनी जुलै ते सप्टेंबर 2025 या कालावधीत त्यांना 8 लाख 63 हजार रुपये दिले होते, तरीही ते त्यांच्याकडे आणखीन पाच लाखांची मागणी करत होते. या धमक्यांना कंटाळून त्यांनी घडलेला प्रकार मालवणी पोलिसांना सांगून पाचही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित पाचजणाविरुद्ध खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अजीज शेख याला रविवारी पोलिसांनी अटक केली तर इतर चौघांचा पोलीस शोध घेत आहेत. अटकेनंतर अजीजला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.