45 वर्षांच्या सुरक्षारक्षकाची रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या
कांदिवलीतील घटनेने तणाव; आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 जानेवारी 2026
मुंबई, – अंधेरीतील एका शोरुममध्ये काम करणार्या प्रभाकर चंद्रशेखर ओझा नावाच्या एका 45 वर्षांच्या सुरक्षारक्षकाने आपल्या राहत्या घरी रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कांदिवलीतील समतानगर परिसरात उघडकीस आली आहे. या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही, मात्र मानसिक नैराश्यातून प्रभाकरने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहेत. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. मृत प्रभाकरच्या पत्नीसह कुटुंबियांची तसेच शोरुममधील मालकासह कर्मचार्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीनंतर त्याच्या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होणार आहे. दरम्यान या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.
प्रभाकर हा कांदिवलीतील समतानगर परिसरात त्याच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतो. सध्या तो अंधेरीतील एका नामांकित शोरुममध्ये सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता. त्याच्याकडे त्याची परवाना असलेली रिव्हॉल्व्हर होती. सकाळी प्रभाकर हा नेहमीप्रमाणे कामावर निघून गेला होता. सायंकाळी तो कामावरुन कांदिवलीतील घरी आला होता. चार वाजता घरात कोणीही नसताना त्याने स्वतच्या रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. अचानक गोळीबाराचा आवाज येताच स्थानिक रहिवाशांनी तिथे धाव घेतली होती. हा प्रकार निदर्शनास येताच स्थानिक रहिवाशांनी ही माहिती समतानगर पोलिसांना दिली.
या माहितीनंतर समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रक्तबंबाळ झालेल्या प्रभाकरला तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. त्यानंतर त्याचा मृतदेह जे. जे हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. घटनास्थळाहून पोलिसांनी प्रभाकरची रिव्हॉल्व्हर, रिकामी पुंगळी आणि जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. त्याच्याकडे पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नाही, त्यामुळे त्याने आत्महत्या का केली याचा खुलासा होऊ शकला नाही.
प्रभाकर हा अंधेरीतील एका शोरुममध्ये गेल्या एक महिन्यांपासून कामाला होता. काही दिवसांपासून तो प्रचंड मानसिक तणावात होता. याच तणावातून त्याने मानसिक नैराश्यातून आत्महत्या केली का, या आत्महत्येमागे अन्य काही कारण आहे का याचा आता पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी एडीआरची नोंद करुन पोलिसांनी तपास सुरु केला आहे. याच गुन्ह्यांत त्याच्या पत्नीसह इतर कुटुंबिय, शोरुमचे मालकासह त्याच्या सहकार्यांची पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.