कारवाईची धमकी देऊन खंडणीसाठी धमकी देणारा गजाआड

तीन डॉक्टरांना धमकावून खंडणी वसुली केल्याचे तपासात उघड

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 जानेवारी 2026
मुंबई, – महानगरपालिकेचे अधिकारी असल्याची बतावणी करुन खाजगी क्लिनिकवर कारवाईची धमकी देऊन एका वयोवृद्ध डॉक्टरला खंडणीसाठी धमकी देणार्‍या तोतया अधिकार्‍याला कांदिवली पोलिसांनी अटक केली. कल्पेश सुभाष कांबळे असे या तोतया मनपा अधिकार्‍याचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत संतोष घेवदे, जावेद आणि अनिल चव्हाण या तिघांचा सहभाग उघडकीस आला असून तिघांनाही पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या चौघांविरुद्ध पोलिसांनी खंडणीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या टोळीने आतापर्यंत तीन डॉक्टरांना कारवाईची धमकी देऊन खंडणी वसुली केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

मदन बुलाटीलाल गुप्ता हे 60 वर्षांचे तक्रारदार डॉक्टर असून ते कांदिवली परिसरात राहतात. त्यांच्या मालकीचे जगदीश शेट्टी रोड, आझाद कंपाऊंड परिसरात एक खाजगी क्लिनिक आहे. आयुष डॉक्टरर्स असोशिएशनचे ते सदस्य असून या संघटनेला काहीजण मनपाचे अधिकारी असल्याची बतावणी करुन डॉक्टरांची फसवणुक करत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या टोळीने अशाच प्रकारे डॉ. अजीत सेवाराम विश्वकर्मा यांची फसवणुक केली होती. त्यांच्याकडे त्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची मागणी करुन या आरोपींनी त्यांच्या क्लिनिकची तपासणी सुरु केली होती. त्यांच्यावर कारवाईची धमकी देऊन त्यांनी त्यांच्याकडे दिड लाखांची खंडणीची मागणी केली होती. मात्र त्यांच्याकडे दिड लाख रुपये नसल्याने ते त्यांच्याकडील पंधरा हजार रुपये घेऊन पळून गेले होते.

अशाच प्रकारे डॉ. महेश रामा यादव यांची या टोळीने फसवणुक केली होती. त्यांच्याकडे कारवाईची धमकी देऊन ऐंशी हजाराची मागणी करुन दहा हजार ऑनलाईन घेऊन पलायन केले होते. त्यामुळे संघटनेने अशा तोतया मनपा अधिकार्‍यांपासून सावध राहण्याचे आहवान केले होते. 31 डिसेंबरला मदन गुप्ता हे त्यांच्या क्लिनिकमध्ये होते. दुपारी एक वाजता त्यांच्या क्लिनिकमध्ये दोन तरुण आले. त्यांनी ते मनपाचे अधिकारी असल्याचे बतावणी करुन त्यांच्याकडे त्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रासह पीसीसीची मागणी केली. यावेळी त्यांनी पीसीसी काय आहे, आम्हाला क्लिनिकसाठी पीसीसी गरज लागत नाही असे सांगितले. यावेळी त्यांनी त्यांचे सहकारी सुनिल वाघ यांना तिथे बोलावून घेतले. यावेळी त्यांनी दोन्ही तोतया मनपा अधिकार्‍याचे मोबाईलवरुन व्हिडीओ रेकॉडिंग सुरु केले होते.

याच दरम्यान एकजण पळून गेला तर दुसर्‍या त्यांनी पकडून ठेवले. ही माहिती नंतर पोलिसांना देण्यात आली. काही वेळानंतर तिथे कांदिवली पोलिसांचे एक पथक आले होते. या पथकाने या तरुणाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याचे नाव कल्पेश कांबळे असल्याचे उघडकीस आले. कल्पेश हा मानखुर्द येथे राहत असून डिलीव्हरी बॉयचे काम करतो. त्याच्यासोबत क्लिनिकमध्ये आलेला संतोष घेवदे होता. कल्पेशने संतोष,जावेद आणि अनिल चव्हाण असे चौघेही वेगवेगळ्या क्लिनिकमध्ये जाऊन ते मनपा अधिकारी असल्याची बतावणी करुन डॉक्टरांना कारवाईची धमकी देत होते.

ही कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडे खंडणीची मागणी करत होते. त्यांच्याकडून मिळेल ती रक्कम घेतल्यांनतर पळून जात होते. अशा प्रकारे कारवाईची धमकी देऊन खंडणी उकाळून फसवणुक करणारी ही सराईत टोळी आहे. या टोळीने तक्रारदारासह त्यांच्या दोन्ही सहकार्‍यांना अशाच प्रकारे कारवाईची धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणी वसुली केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर चारही आरोपीविरुद्ध पोलिसांनी तोतयागिरी करुन खंडणीसह फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत कल्पेश कांबळे याला पोलिसांनी अटक केली तर इतर तिघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page