महिला पोलीस निरीक्षकाच्या घरी अकरा लाखांच्या दागिन्यांची चोरी
चोरीचा गुन्हा दाखल होताच मोलकरणीला मुद्देमालासह अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
6 जानेवारी 2026
मुंबई, – दादर येथील रेल्वे पोलीस वसाहतीत राहणार्या एका महिला पोलीस निरीक्षकाच्या घरी साफसफाईचे काम करताना कपाटातील लॉकरमधून सुमारे अकरा लाखांचे विविध सोन्याचे दागिन्यांवर हातसफाई करुन नोकरी सोडून गेलेल्या एका मोलकरणीला गुन्हा दाखल होताच माटुंगा पोलिसांनी अटक केली. कविता प्रतिक शिंदे असे या आरोपी मोलकरणीचे नाव असून तिच्याकडून पोलिसांनी सव्वादहा लाखांचे चोरीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. चोरीच्या गुन्ह्यांत अटक केल्यांनतर तिला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तिच्याकडून उर्वरित दागिने लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रश्मी धोंडीराम पांगशे या महाराष्ट्र पोलीस दलात काम करत असून सध्या पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. दादरच्या रेल्वे पोलीस वसाहतीच्या पोलीस निरीक्षक इमारतीमध्ये त्या त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीसोबत राहतात. तिचे पती निलेश रत्नागिरीच्या पाटबंधारे विभागात कामाला असून नोकरीनिमित्त ते रत्नागिरीच्या खेड शहरात राहतात. सुट्टीत ते मुंबईत येतात. त्यांच्या घरी मोनिका ही महिला कामाला असून तिने कविताला त्यांच्या घरी कामावर ठेवले होते. जानेवारी 2025 पासून कविता ही तिथे नियमित कामासाठी येत होती. मात्र नोव्हेंबरला तिने नोकरी सोडली होती. रश्मीच्या आई मीना पांगशे या कॅन्सर पेंशट असल्याने त्या त्यांच्या घरी राहत होत्या. तिथेच त्यांच्यावर औषधोपचार सुरु होते. यावेळी तिने तिचे काही सोन्याचे दागिने त्यांच्या घरी ठेवले होते.
2021 रोजी रश्मी यांच्या आईचे निधन झाले होते. आईच्या निधनानंतर ते दागिने त्यांच्या कपाटात सुरक्षित ठेवले होते. जून 2025 रोजी तिचे वडिल घरी आले होते, यावेळी आईचे दागिने दाखवून तिने ते दागिने तिच्या वडिलांना घेऊन जाण्यास सांगितले, मात्र त्यांनी दागिने तिच्याकडे ठेवण्यास सांगितले. जून महिन्यांत तिने संबंधित दागिने शेवटचे पाहिले होते. त्यानंतर तिने कपाटातून ते दागिने काढले नाही. याच दरम्यान घरातील कपाटातील लॉकरची चावी अचानक गायब झाली होती. सर्वत्र चावीचा शोध घेतल्यानंतर ती चावी कुठेच सापडली नाही. याबाबत तिने कविताकडे विचारणा केली होती, मात्र तिने उडवाउडवीचे उत्तरे दिली होती. त्यानंतर कामामुळे त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. 3 जानेवारी रश्मी पांगशे यांनी चावी बनविणार्या व्यक्तीला बोलावून लॉकरची नवीन चावी बनवून घेतली होती.
लॉकर उघडल्यानंतर त्यांना त्यांच्या आईचे सुमारे अकरा लाखांचे विविध सोन्याचे दागिने गायब असल्याचे दिसून आले. जून 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत या दागिन्यांची चोरी झाली होती. यावेळी कविता शिंदे ही त्यांच्याकडे कामाला होती, मात्र नोव्हेंबर महिन्यांत ती नोकरी सोडून गेली होती. त्यामुळे त्यांनी तिच्यावर चोरीचा संशय व्यक्त करुन माटुंगा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर पोलिसांनी कविता शिंदे हिच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब घटुकडे, पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस हवालदार आनंद तांबे, पोलीस शिपाई महेश नेहारे, पंडित बंजारा, संभाजी बार्शी, योगेश नवले, महिला पोलीस शिपाई प्रियांका रावरे यांनी तपास सुरु केला होता. या पथकाने कविताला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
सुरुवातीला तिने तिचा या चोरीमागे काहीही संबंध नसल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी दणका देताच तिने चोरीची कबुली दिली. या कबुलीनंतर तिने सव्वादहा लाखांचे चोरीचे दागिने पोलिसांच्या स्वाधीन केले होते. याच गुन्ह्यांत नंतर तिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. तिची पोलिसांकडून चौकशी सुरु असून तिच्याकडून उर्वरित सोन्याचे दागिने लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.