दिवसा रेकी करुन रात्री वाहनांची चोरी करणार्या आरोपीस अटक
आरोपीविरुद्ध 26 गुन्ह्यांची नोंद तर चार वाहन चोरीची उकल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
6 जानेवारी 2026
मुंबई, – दिवसा रेकी करुन रात्रीच्या वेळेस विविध ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांची चोरी करणार्या एका आरोपीस गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. अफसर जाफर खान ऊर्फ पप्पू असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी बांगुरनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. अफसर हा वाहन चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्याच्याविरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात 26 हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे तर त्याच्या अटकेने बांगुरनगर पोलीस ठाण्यातील दोन तर पवई आणि वनराई पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक अशा चार वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
अनिल नामदेव शेवाळे हे 49 वर्षांचे तक्रारदार मालाडच्या चिंचोली बंदर रोड, शिवपार्वती अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचा होलसेल अंडी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यासाठी त्यांनी अशोक लेलँड डोस्ट कंपनीचा एक ट्रक घेतला होता. 3 मे 2025 रोजी ट्रक त्यांनी मालाडच्या माईडस्पेस, फॅशन फॅक्टरीसमोर पार्क केली होती. हा ट्रक रात्रीच्या वेळेस अज्ञात व्यक्तीने चोरी केला होता. दुसर्या दिवशी हा प्रकार निदर्शनास येताच अनिल शेवाळे यांनी बांगुरनगर पोलिसांत ट्रक चोरीची तक्रार केली होती.
याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेकडून संमातर तपास सुरु होता. सीसीटिव्ही फुटेजवरुन या गुन्ह्यांतील आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे तसेच त्याची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले होते. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली सहज्ञाीेीतही. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या आठ महिन्यांत वॉण्टेड असलेल्या अफजल खान याला जोगेश्वरी येथून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. तो वाहनचोरीच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्घ गोरेगाव, वर्सोवा, आंबोली, अंधेरी, दहिसर पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन, ओशिवरा पोलीस ठाण्यात बारा, गुन्हे शाखा, डी. एन नगर, काशिमिरा, कुर्ला पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक अशा 26 हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. यातील बहुतांश गुन्ह्यांत त्याच्यावर अटकेची कारवाई झाली हाती.
जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पुन्हा दिवसा रेकी करुन विविध ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांची चोरी करत होता. त्याच्या अटकेने चार वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यापैकी दोन गुन्हे बांगुरनगर पोलीस ठाण्यात नोंद असल्याने त्याला पुढील चौकशीसाठी बांगुरनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.