जाहिरात निर्मात्याच्या घरी नोकराची साडेपंधरा लाखांची हातसफाई
मुद्देमालासह पळून गेलेल्या 42 वर्षांच्या नोकराविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
6 जानेवारी 2026
मुंबई, – एका खाजगी कंपनीसह जाहिरात निर्मात्याच्या घरी त्यांच्याच घरातील विश्वासू नोकराने हातसफाई करुन सुमारे साडेपंधरा लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केल्याची घटना गावदेवी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी राजेंद्र बेनधुरा जैना या 42 वर्षांच्या नोकराविरुद्ध गावदेवी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्र हा मूळचा ओरिसाचा रहिवाशी असून चोरीनंतर तो त्याच्या गावी पळून गेल्याची शक्यता असल्याने त्याच्या अटकेसाठी एक टिम लवकरच तिथे जाणार आहे.
शिवेन सुरेंद्रनाथ हे 59 वर्षांचे तक्रारदार जाहिरात निर्माता असून गावदेवी येथील ब्रिच कॅण्डी, वेस्ट फिल्ड इस्टेट कंपाऊंडमध्ये एकटेच राहतात. त्यांचा जाहिरात फिल्म बनविण्याचा व्यवसाय असून त्यांनी आतापर्यंत अनेक जाहिरात फिल्म बनविले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्याकडे राजेंद्र हा घरगडी म्हणून कामाला होता. तो मूळचा ओरिसाच्या शिखरपूर, बलेश्वरचा रहिवाशी असून गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्यासोबत दिवसा काम करुन रात्रीच्या वेळेस राहत होता.
शिवेन हे आरडब्ल्यूआयटीसी या क्लबचे सभासद तसेच डायमंड बॅण्ड रेसींग सिंडीगेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक आहेत. त्यांच्याकडे त्यांच्या मालकीचे काही घोडे आहेत. या घोड्याच्या शर्यतीतू त्यांना अनेकदा बक्षिण म्हणून कॅश, सोने-चांदीचे ट्रॉफी मिळाले आहे. ते सर्व ट्रॉफी त्यांनी त्यांच्या घरी ठेवले होते. 23 नोव्हेंबर 2025 रोजी राजेंद्र हा महत्त्वाचे घरगुती काम असल्याचे सांगून कोलकाता येथे विमानाने निघून गेला होता.तिथे गेल्यानंतर त्याने पाच दिवसांत परत येतो असे सांगितले,
मात्र तो परत आला नाही. त्याला कॉल केल्यानंतर त्याने मोबाईल बंद ठेवला होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी घरातील सामानाची तपासणी केली होती. यावेळी त्यांना विविध ट्रॉफीसह इतर सामान असा सुमारे साडेपंधरा लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केल्याचे दिसून आले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी गावदेवी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर राजेंद्र जैनाविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.