लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यांतील 20 वर्षांच्या आरोपीला कारावास
घरासमोर खेळणार्या नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 जानेवारी 2026
मुंबई, – मैत्रिणीसोबत घरासमोर खेळणार्या आणि खेळता खेळता घरी आलेल्या एका नऊ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या मनुवर गेणू मलिक नावाच्या एका 52 वर्षांच्या आरोपीला विशेष सेशन कोर्टाने दोषी ठरवून कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. वीस वर्षांचा सश्रम कारावास, पाच हजाराचा दंड आणि दंडाची रक्कम न भरल्यास आणखीन दोन महिन्यांचा कारावास अशी शिक्षेची तरतूद असल्याचे पोलिसांनी सांगितले. तीन वर्षांत या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन आरोपीला शिक्षा झाल्याने तपास अधिकार्यांचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले आहे.
पिडीत मुलगी ही नऊ वर्षांची ही असून खार परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. 18 डिसेंबर 2022 रोजी ती तिच्या मैत्रिणीसोबत खेळत होती. खेळता खेळता ती तिच्या मैत्रिणीसोबत आरोपीच्या घरी गेली होती. यावेळी ती एकटीच असल्याचे समजून त्याने घराला आतून कडी लावून तिच्याशी लैगिंक अत्याचार केला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली होती. रडत बसलेल्या या मुलीची चौकशी केल्यानंतर तिच्या आईला घडलेला प्रकार समजला होता. त्यानंतर तिने निर्मलनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी मनुवर मलिक याच्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक एस. टी चव्हाण यांच्याकडे होता. 19 डिसेंबरला अटक केल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून तो न्यायालयीन कोठडीत जेलमध्ये आहे. या गुन्ह्यांचा तपास पूर्ण होताच त्याच्याविरुद्ध पोलिसांनी आरोपपत्र सादर केले होते. यावेळी पिडीत मुलीसोबत खेळणार्या मैत्रिणीसह इतर साक्षीदारांचे पुरावे आणि भक्कम पुरावे पोलिसांनी विशेष कोर्टात सादर केले होते. या खटल्याची सुनावणी अलीकडेच पूर्ण झाली होती. साक्षीदारांची जबानी, सादर केलेल्या पुराव्यावरुन कोर्टाने आरोपीला दोषी ठरविले होते. मंगळवारी सेशन कोर्टाच्या न्या. बी. एस गरे यांनी आरोपी मनुवर मलिकला वीस वर्षांचा कारावास, पाच हजाराचा दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास त्याला आणखीन दोन महिने कारावास भोगावा लागणार आहे.
पोलीस उपायुक्त मनिष कलवानिया, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश वाघ, पोलीस निरीक्षक युवराज खाडे यांनी केसच्या सुनावणीवर सतत लक्ष ठेवून कोर्ट पैरवी अधिकारी, कारकून यांना वेळोवेळी सूचना देऊन मार्गदर्शन केले. पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप जरांडे, पोलीस हवालदार प्रदीप आगवणे, गुन्हे मदतनीस पोलीस हवालदार श्रीकृष्ण सावळे, कोर्ट कारकून पोलीस हवालदार धर्मेंद्र धनु, महिला पोलीस शिपाई कल्पना जाधव, प्रितम कांबळे यांनी गुन्ह्यांतील साक्षीदार, पंच यांना वेळेवर कोर्टात हजर ठेवून साक्षीच्या अनुषगांने मार्गदर्शन केले, त्यामुळे आरोपीला शिक्षा झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.