भांडुप येथे 25 वर्षांच्या तरुणाची तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या
पूर्ववैमस्नातून हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 जानेवारी 2026
मुंबई, – भांडुप येथै शंकरप्रसाद यादव ऊर्फ कल्ली नावाच्या एका 25 वर्षांच्या तरुणाची पाच ते सहाजणांच्या टोळीने तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर सर्व आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. पूर्ववैमस्नातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान हत्येच्या या घटनेने भांडुप परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता भांडुप येथील तुलशेतपाडा परिसरात घडली. याच परिसरात शंकरप्रसाद हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता तो तुळशेतपाडा परिसरात आला होता. यावेळी त्याचे त्याच परिसरात राहणार्या तरुणांशी वाद झाला होता. त्यांच्याशी त्यांचा यापूर्वीही वाद झाला होता. या वादातून त्यांनी त्याच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता.
रक्तबंबाळ झालेल्या शंकरप्रसादला स्थानिक रहिवाशांनी तातडीने घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. शंकरप्रसादच्या शरीरावर तिक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या 22 हून अधिक जखमा असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही माहिती मिळताच भांडुप पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
हल्ल्याच्या वेळेस शंकरप्रसादसोबत त्याचा मित्र सौरभ अहिरे होता. तो मिलिंद नगर परिसरात राहत असून शनिवारी तो त्याला भेटण्यासाठी आला होता. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. हत्येनंतर सर्व आरोपी पळून गेले असून त्यांची ओळख पटली आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. शंकरप्रसाद आणि आरोपींमध्ये जुना वाद होता. याच वादातून ही हत्या झाल्याचे बोलले जाते.