ब्लॉक ट्रेडिंग गुंतवणुकीच्या बहाण्याने पती-पत्नीची फसवणुक
सव्वादोन कोटीच्या फसवणुकीप्रकरणी दोन बंधूविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 जानेवारी 2026
मुंबई, – कंपनीच्या माध्यमातून ब्लॉक ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून पती-पत्नीची त्यांच्याच परिचित व्यावसायिक मित्रांनी सुमारे सव्वादोन कोटीची फसवणुक केल्याची घटना ताडदेव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी शशांक सुनिल सिंघानिया आणि सिद्धांत सुनिल सिंधानिया या व्यावसायिकाविरुद्ध ताडदेव पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी व्यावसायिक फसवणुकीच्या गुन्हयांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध वरळी, ताडदेव आणि कफ परेड पोलीस ठाण्यात अशाच तीन फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अभिषेक शिवनरेश सराफ हे ताडदेव परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. दोन वर्षांपूर्वी त्यांचा मित्र मनिष केडिया याच्यामार्फत् त्यांची सिंधानिया बंधूंशी ओळख झाली होती. त्यांनी त्यांची सेन्सा फर्म नावाची एक कंपनी असून ही कंपनीत ब्लॉक ट्रेडिंग व्यवसायाशी संबंधित असल्याचे सांगितले होते. त्यांच्या कंपनीमार्फत ब्लॉक ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक केल्यास त्यांना या दोघांनी चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. अल्पवधीत त्यांनी त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांना ब्लॉक ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. डिसेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत त्यांच्यासह त्यांच्या पत्नीने सिंधानिया बंधूंच्या कंपनीत टप्याटप्याने सुमारे सव्वादोन कोटीची ब्लॉक ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक केली होती.
हा संपूर्ण व्यवहार सिंधानिया यांच्या ताडदेव येथील महालक्ष्मी रेसकोर्ससमोरील के. के मार्ग, एक्सार कंपनीच्या अठरा मजल्यावरील प्लॉट क्रमांक अकरामध्ये झाला होता. मात्र या गुंतवणुकीवर त्यांनी त्यांना कुठलाही परवाता दिला नाही. विचारणा केल्यानंतर ते दोघेही विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. हा व्यवहार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्याकडे गुंतवणुकीच्या रक्कमेची मागणी सुरु केली होती. मात्र एक ते दिड वर्ष उलटूनही त्यांनी त्यांची रक्कम परत केली नाही.
चौकशीदरम्यान त्यांना सिंधानिया बंधू हे फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सराईत व्हाईट कॉलर गुन्हेगार असल्याचे समजले. त्यांच्याविरुद्ध गेल्या वर्षी वरळी आणि कफ परेड पोलीस ठाण्यात तर चालू वर्षांत ताडदेव पोलीस ठाण्यात तीन फसवणुकीच्या गुन्हयांची नोंद झाल्याची माहिती मिळाली होती. हा प्रकार निदर्शनास येताच अभिषेक सराफ यांनी ताडदेव पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर शशांक सिंधानिया आणि सिद्धांत सिंधानिया यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्यांचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद धात्रक हे करत आहेत. सिंधानिया बंधू हे चर्चगेट येथील मरिनड्राईव्ह, डी रोड विष्णू महल अपार्टमेटच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 39 मध्ये राहतात. फसवणुकीचा गुन्हा होताच ते दोघेही पळून गेले असून त्यांना या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद धात्रक यांनी सांगितले.