खंडणीच्या गुन्ह्यांत आई-बाबा फाऊंनडेशनच्या संस्थापकाला अटक

टिप देणार्‍या इतर सहकार्‍याच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरु

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 जानेवारी 2026
मुंबई, – साकिनाका येथील एका किराणा मालाच्या व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी आई-बाबा फाऊंनडेशनचा संस्थापक योगेश रमेश मौर्या याला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. शनिवारी त्याला किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे. परिसरातील व्यावसायिकामध्ये योगेशची प्रचंड दहशत असून भीतीपोटी त्याच्याविरुद्ध कोणीही तक्रार करत नव्हते. त्याची 120 जणांची टोळी असून त्यात काही पत्रकार असल्याचा दावा योगेशने केला होता. तक्रारदार व्यावसायिकाकडून साडेबारा लाखांची खंडणी वसुलीनंतर त्याने त्यांना पुन्हा पाच लाखांच्या खंडणीसाठी धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत राजन सिंग ऊर्फ बटला, मनोज गुप्ता यांच्यासह इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला आहे. या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

तक्रारदार मयुर दौलत भंडलकर हा साकिनाका परिसरात राहतो. याच परिसरात उमिया स्टोअर्स नावाचे एक किराणा मालाचे दुकान असून दुकानाचे मालक प्रविण गेला गामी आहेत. त्यांच्या दुकानात मयुर हा गेल्या चार वर्षांपासून मालाची ने-आण करण्याचे काम करतो. गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यांत तो व्यापार्‍याला मालाची डिलीव्हरीसाठी जात होता. यावेळी त्याला आई-बाबा फाऊंनडेशनचे संस्थापक योगेश मौर्या भेटला. त्याने त्याला त्याच्या गाडीमध्ये चोरीचा माल आहे. तुझ्यासह तुझ्या मालकाला रेशनिंगचा माल विकता म्हणून खोट्या गुन्ह्यांत अटक करण्याची धमकी दिली होती. माझी 120 जणांची टोळी असून त्यात काही पत्रकार आहेत. तुम्ही माझे ऐकले नाहीतर तुला तुझ्याच याच गाडीसमोर ढकळून या जगातून उडवून देऊ अशी धमकी दिली होती.

परिसरातील सर्व व्यापारी मला पैसे देतात, त्यामुळे तुझ्या मालकाला मला पैसे देण्यास सांग नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली. या घटनेनंतर त्याने ही माहिती त्याचे मालक प्रविण गामी यांना दिली. त्यामुळे त्यांनी योगेशची भेट घेतली होती. यावेळी त्याने त्यांना तिथे व्यवहार करायचा असेल तर पाच लाख रुपयांची खंडणी आणि दरमाह पन्नास हजार रुपयांचा हप्ता द्यावा लागेल असे सांगितले. पैसे दिले नाहीतर त्यांना तिथे व्यवसाय करता येणार नाही तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. जिवाच्या भितीने त्यांनी योगेशला पाच लाख रुपये दिले होते. ही रक्कम दिल्यांनतर योगेश व त्याचे सहकारी त्यांची गाडी अडवून सतत पैशांची मागणी करत होते. पैसे दिले नाहीतर हत्येची धमकी देत होती. त्यामुळे त्यांनी त्याला वेळोवेळी खंडणीची रक्कम दिली आहे.

आतापर्यंत योगेशने प्रविण गामी यांच्याकडे साडेबारा लाख रुपये खंडणी स्वरुपात घेतले होते. याच दरम्यान प्रविण गामी यांना योगेशची परिसरात प्रचंड दशहत असून त्याची आई-बाबा फाऊंनडेशन नावाची एक संस्था आहे. त्याचे इतर सहकारी असून ते व्यावसायिकाकडून खंडणी वसुली करतात. या व्यवसायिकांमध्ये त्याची प्रचंड दशहत असल्याने कोणीही त्याच्याविरुद्ध तक्रार करत नसल्याची माहिती समजली होती. 23 जानेवारीला त्यांनी मयुर भंडलकरला सांताक्रुजच्या वाकोला येथे गहू-तांदूळाची डिलीव्हरीसाठी पाठविले होते. यावेळी योगेशने त्याला थांबवून डिलीव्हरीनंतर पाच लाख रुपये आणून देण्यास सांगितले. यावेळी त्याने त्यांना पैसे देण्यास नकार देताच त्याने त्यांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी दिली होती.

या घटनेनंतर प्रविण गामी आणि मयुर भंडलकर हे दोघेही गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकात गेले होते. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांनी योगेश मौर्यासह त्याच्या सहकार्‍याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत योगेशविरुद्ध खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच साकिनाका येथे खंडणीचा पाच लाखांचा हप्ता घेताना योगेशला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. तपासात त्याने त्याला व्यावसायिकांची टिप राजन सिंग आणि मनोज गुप्ता यांच्याकडून मिळत असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या दोघांनाही या गुन्ह्यांत सहआरोपी करण्यात आले आहे. योगेशला शनिवारी किल्ला कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page