मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 जानेवारी 2026
मुंबई, – बोरिवलीतील एका मसाज पार्लरमध्ये मसाजच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी स्पा मॅनेजर, कॅशिअर आणि दोन हाऊसकिपिंग कर्मचारी अशा चौघांना पोलिसांनी अटक केली. अस्लम अजीज शेख, गणेश सुरेश मुरुडकर, स्वप्निल सुमंत सावंत आणि सुधीरकुमार राजेंद्र प्रसाद अशी या चौघांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर चारही आरोपींना पुढील कारवाईसाठी बोरिवली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी दहा महिलांची सुटका केली असून या सर्व महिलांना बोरिवलीतील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
बोरिवलीतील शिंपोली रोड, अदानी इलेक्ट्रीकसमोरील पूर्व प्लाझा सहकारी सोसायटीमध्ये मुद्रम नावाचे एक मसाज पार्लर आहे. या मसाज पार्लरमध्ये कामाला असलेल्या महिलांना तिथे ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी प्रवृत्त केले जात आहे. मसाज पार्लरचे मालक आणि चालक इतर कर्मचार्यांच्या मदतीने सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती युनिट दोनच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर एका बोगस ग्राहकाच्या मदतीने त्याची शहानिशा करण्यात आली होती.
ठरल्याप्रमाणे बुधवारी सायंकाळी बोगस ग्राहक मुद्रम मसाज पार्लरमध्ये गेला होता. त्याने मॅनेजरकडे शारीरिक सुखासाठी काही तरुणींची मागणी केली होती. यावेळी त्याला तिथे उपस्थित काही महिलांना दाखविण्यात आले होते, त्यापैकी एका महिलेची बोगस ग्राहकाने निवड केली होती. त्यांच्यात ठरल्याप्रमाणे त्याने त्यांना शारीरिक सुखासाठी पैसे दिले होते. या माहितीत तथ्य असल्याचे आढळून येताच त्याने पोलिसांना सिग्नल दिला होता. यावेळी तिथे पाळत ठेवलेल्या गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी तिथे छापा टाकला होता.
या कारवाईत पोलिसांनी मसाज पार्लरचा मॅनेजर गणेश मुरुडकर, कॅशिअर अस्लम शेख, हाऊसकिपिंग कर्मचारी स्वप्निल सावंत आणि सुधीरकुमार या चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. घटनास्थळी असलेल्या दहा महिलांची पोलिसांनी सुटका केली. त्यांच्या चौकशीत तिथे मसाज पार्लरच्या नावाने सेक्स रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या चारही आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सुटका केलेल्या दहा महिलांना नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले. मेडीकलनंतर त्यांना बोरिवलीतील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी दोन मोबाईल, 33 हजार रुपयांची कॅश आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. तपासात मसाज पार्लरचे मालक आणि चालक सागर सत्यराम चौहाण आणि सिमरण असल्याचे उघडकीस आले.
या गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अटकेनंतर चारही आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.