पूर्ववैमस्नातून 24 वर्षांच्या तरुणावर तिघांकडून प्राणघातक हल्ला

घाटकोपर येथील घटना; तिन्ही आरोपींना अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 जानेवारी 2026
मुंबई, – पूर्ववैमस्नातून एका 24 वर्षांच्या तरुणावर तिघांनी तलवारीसह लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण करुन प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सुजीत काशिनाथ भुईर हा जखमी झाला असून त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या तिन्ही आरोपींना पंतनगर पोलिसांनी अटक केली. कल्पेश ऊर्फ कपिल पांडुरंग महाबळे, सनावर मुन्नावर शेख आणि रामप्रशांत ऊर्फ प्रशांत आंजेया काशिपुरम अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना बुधवारी रात्री साडेअकरा वाजता घाटकोपर येथील वसंतराव नाईक मार्ग, कामराजनगर, राजश्री मेडीकलसमोर घडली. याच परिसरातील साई श्रद्धा सोसायटीमध्ये सुजीत हा राहत असून त्याचा स्वतचा व्यवसाय आहे. तिन्ही आरोपी याच परिसरात राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. त्यांच्यात एक जुना वाद होता. बुधवारी रात्री साडेअकरा वाजता सुजीत हा त्याच्या स्कूटीवरुन घरी जात होता. यावेळी तिन्ही आरोपींनी जुन्या वादातून सुजीतसोबत भांडण सुरु केले होते.

काही कळण्यापूर्वीच कल्पेशने त्याच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला तर सनावर आणि रामप्रशांत या दोघांनी त्याला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यात सुजीत हा गंभीररीत्या जखमी झाला होता. डोक्याला, खांद्याला, हाताला आणि गालाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे बोलले जाते. या घटनेची माहिती मिळताच पंतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

याप्रकरणी सुजीतची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या तिन्ही आरोपींना घाटकोपर येथून पोलिसांनी अटक केली. यातील कल्पेश हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध काही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच गुन्ह्यांत ते तिघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page