पोलीस ठाण्यात महिला उपनिरीक्षकाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 जानेवारी 2026
मुंबई, – विरोधकाच्या आधी आपली तक्रार नोंदवावी यासाठी एका महिलेने गुरुवारी सायंकाळी मालवणी पोलीस ठाण्यात प्रचंड गोंधळ घातला, ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्य बजाविणार्या महिला अधिकार्याला शिवीगाळसह धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. मोबाईल फेंकून मारल्याने ही महिला अधिकारी जखमी झाली होती. याप्रकरणी शरीन नावाच्या तरुणीविरुद्ध मालवणी पोलिसांनी भारतीय न्याय सहिता कायद्याच्या विविध कलमांच्या गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत तिला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून तिच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अमृता अमरसिंह देशमुख या बोरिवलीतील एमएचबी कॉलनीत राहत असून सध्या पोलीस उपनिरीक्षक म्हणून मालवणी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. गुरुवारी सकाळी आठ वाजता त्या दिवसपाळी ड्यूटीवर हजर झाल्या होत्या. यावेळी त्यांच्याकडे ठाणे अंमलदाराची जबाबदारी सोपविण्यात आली होती. सायंकाळी साडेचार वाजता पोलीस ठाण्यात शरीन नावाची एक तरुणी आली होती. तिचे विरोधकाशी वाद झाला होता, या वादातून त्यांच्यात भांडण झाले होते. त्यामुळे तिने तिच्या विरोधकाविरुद्ध तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता. तिने तिची आधी तक्रार नोंदवावी म्हणून पोलीस ठाण्यातच प्रचंड गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.
यावेळी अमृता देशमुख यांनी तिला शांत राहून तक्रार नोंदविण्याची विनंती केली होती. तरीही ती प्रचंड आक्रमक झाली होती. तिने अमृता देशमुख यांच्याशी वाद घालून शिवीगाळ करुन धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. वारंवार समजूत घालून ती त्यांना अश्लील शिवीगाळ करत होती. त्यांच्याविषयी आक्षेपार्ह शिवीगाळ करुन विधान करुन सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करुन तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
या प्रकारानंतर वरिष्ठांच्या आदेशावरुन अमृता देशमुख यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी शरीन या तरुणीविरुद्ध पोलीस ठाण्यात गोंधळ घालणे, कर्तव्यावर उपस्थित असलेल्या सरकारी महिला अधिकार्याला शिवीगाळ करुन धक्काबुक्की करणे, मोबाईल फेंकून मारुन दुखापत करणे तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्यांत तिच्यावर अद्याप अटकेची कारवाई करण्यात आली नाही. तिला पाहिजे आरोपी दाखविण्याताअले असून तिला लवकरच या गुन्ह्यांत अटक केली जाणार आहे. गुरुवारी सायंकाळी मालवणी पोलीस ठाण्यात झालेल्या या गोंधळामुळे तिथे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.