चहाच्या टपरीवर काम करणार्‍या अल्पवयीन मुलाची हत्या

हत्येचा गुन्हा दाखल होताच आरोपीस अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 फेब्रुवारी 2026
मुंबई, – चहाच्या टपरीवर काम करणार्‍या अंशु वर्मा नावाच्या एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलाची त्याच्याच परिचित आरोपीने बेदम मारहाण आणि नंतर गळा आवळून हत्या केल्याची घटना न्यू प्रभादेवी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी दादर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून काही तासांत आरोपीस अटक केली. बिरेंद्र श्रीबहादूर पाल असे या 22 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना रविवारी रात्री दोन वाजता न्यू प्रभादेवी येथील कामगारनगर क्रमांक एकच्या चाळ क्रमांक 22/23 मध्ये घडली. याच परिसरात अक्षय मारुती पाटील हा राहत असून तिथेच त्याच्या मालकीची एक चहाची टपरी आहेत. या पटरीमध्ये अंशु हा कामाला होता. दिवसभर चहाच्या टपरीवर काम करुन तो कामगारनगर येथील रुममध्ये झोपत होता. शनिवारी रात्री तो काम करुन घरी गेला होता. यावेळी त्याने मद्यप्राशन केले होते. तिथे त्याचे बिरेंद्रशी क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादातून त्याने त्याला बेदम मारहाण करुन त्याची गळा आवळून हत्या केली होती.

दुसर्‍या दिवशी हा प्रकार अक्षय पाटीलला समजला होता. त्यामुळे त्याने ही माहिती दादर पोलिसांना दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. बेशुद्धावस्थेत असलेल्या अंशुला जवळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल नंतर पोलिसांना प्राप्त झाला होता. त्यात त्याचा मारहाणीसह गळा आवळून हत्या झाल्याचे उघडकीस आले होते.

या अहवालानंतर पोलिसांनी बिरेंद्र पाल याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या बिरेंद्रला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page