जेठवा विकासक पिता-पूत्राविरुद्ध आणखीन एका गुन्ह्यांची नोंद
गुंतवणुकीसह पाच फ्लॅटच्या आमिषाने 2.97 कोटीचा घातला गंडा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 फेब्रुवारी 2026
मुंबई, – फ्लॅटच्या आमिषाने अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणार्या जेठवा पित्रा-पूत्र असलेल्या विकासकाविरुद्ध बोरिवली पोलीस ठाण्यात आणखीन एका फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 60 वर्षांच्या एका वयोवृद्धाला गुंतवणुकीसह पाच फ्लॅटच्या आमिष दाखवून या पिता-पूत्राने 2 कोटी 97 लाख रुपयांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी अशोक जेठवा आणि मिहीर अशोक जेठवा यांच्याविरुद्ध बोरिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील व्हॉईट कॉलर गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध पंधरा ते वीसहून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
60 वर्षांचे तक्रादार प्रज्योत रमाकांत दाभोळकर हे त्यांच्या कुटुंबियांसोबत कांदिवलीतील आशानगर, न्यू श्वेता सहकारी सोसायटीमध्ये राहतात. सध्या ते सेवानिवृत्त झाले आहेत. अकरा वर्षांपूर्वी त्यांची जेठवा पिता-पूत्रांशी ओळख झाली होती. या भेटीत त्यांनी त्यांची त्रिवेणी डेव्हलपर्स नावाची एक बांधकाम क्षेत्राशी संबंधित कंपनी असून या कंपनीचे शहरात विविध ठिकाणी इमारतीच्या बांधकामाचे प्रोजेक्ट सुरु आहेत. त्यापैकी एक प्रोजेक्ट बोरिवलीतील निल-आकाश सहकारी सोसायटीच्या पुर्नविकासाचे असल्याचे सांगितले होते. या प्रोजेक्टमध्ये त्यांनी त्यांना गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर त्यांना नऊ टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांना त्यांच्या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट घ्यायचा असेल तर त्यांना स्वस्तात फ्लॅट देण्याचे मान्य केले होते.
त्यांच्या या आमिषाला बळी पडून त्यांनी त्यांच्या बोरिवलीतील प्रोजेक्टमध्ये 2 कोटी 12 लाख तर त्यांच्या सासूने 85 लाखांची गुंतवणुक केली होती. यावेळी त्यांच्यात एक करार झाला होता. त्यात त्यांनी त्यांना गुंतवणुकीवर नऊ टक्के व्याजदर देण्याचे तसेच पैसे परत केले नाहीतर त्यांच्या निल-आकाश सोसायटीमध्ये 1401, 1402, 1403, 1501 आणि 1502 क्रमांकाचे पाच फ्लॅट देण्याचे नमूद केले होते. मात्र ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांना गुंतवणुकीवर नऊ टक्के व्याज दिले नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे पाच फ्लॅटची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांनी त्यांना फ्लॅटचाही ताबा दिला नाही. अशा प्रकारे जेठवा पिता-पूत्रांनी त्यांच्याकडून 2 कोटी 97 रुपये घेऊन त्यांना कुठलाही परतावा किंवा फ्लॅट न देता त्यांची फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी त्यांच्याविरुद्ध बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अशोक जेठवा आणि मिहीर जेठवा या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या दोघांविरुद्ध अशाच प्रकारे विविध पोलीस ठाण्यात पंधरा ते वीसहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या या दोघांना गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यांत पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांचा संबंधित सर्व पोलिसांनी ताबा घेतला होता.
त्यांच्या अटकेची माहिती मिळताच त्यांच्याविरुद्ध आणखीन काही तक्रारदार पुढे येत आहे. गेल्याच आठवड्यात त्यांच्याविरुद्ध अशाच प्रकारे अन्य एका गुन्ह्यांची नोंद झाली होती. आता प्रज्योत दाभोळकर यांच्या तक्रारीवरुन त्यांच्याविरुद्ध रविवारी बोरिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीची नोंद केली आहे. जेठवा पिता-पूत्र फसवणुकीच्या गुन्ह्यांतील फाईट कॉलर गुन्हेगार असल्याचे बोलले जाते.