मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 फेब्रुवारी 2026
मुंबई, – दिवाणी दावा निकाली काढण्यासाठी एका व्यावसायिकाकडून घेतलेल्या सुमारे 74 लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी वैभव परेश ठक्कर या भामट्याविरुद्ध सांताक्रुज पोलिसांनी अटक केली. वैभव ठक्करने तो मुख्यमंत्र्याचा खाजगी स्वीय सहाय्यक तसेच त्याची पत्नी आयपीएस अधिकारी असून ती सध्या मुंबई पोलीस दलात पोलीस उपायुक्त म्हणून काम करत असल्याची बतावणी करुन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले. वैभव हा फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अशाच प्रकारे इतर काही गुन्हे दाखल आहेत.
37 वर्षांचे तक्रारदार व्यावसायिक असून ते सांताक्रुज येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. काही महन्यांपूर्वी त्यांनी सतीश शर्मा या व्यक्तीविरुद्ध दिडोंशी सत्र न्यायालयात चार दिवाणी दावा दाखल केले होते. ते चारही दावे सध्या न्यायालयात प्रलंबित आहेत. याच दरम्यान त्यांच्या एका मित्राने त्यांची वैभव ठक्करविषयी माहिती दिली होती. या माहितीनंतर त्यांनी वैभवची भेट घेतली होती. या भेटीत त्याने तो मुख्यमंत्र्यांचा खाजगी स्वीय सहाय्यक असून त्याची पत्नी आयपीएस अधिकारी आहे. सध्या ती मुंबई पोलीस दलात पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहे. त्याच्या अनेक ठिकाणी चांगल्या ओळखी असून त्यांना दिवाणी दाव्यात मदत करण्यो आश्वासन दिले होते. वैभव हा एका महागड्या फॉनच्युनर वाहनामधून पोलिसांसारख्या दिसणार्या खाजगी बॉडीगार्डसोबत आला होता. त्यामुळे त्यांना खरोखरच मुख्यमंत्र्याचा खाजगी स्वीय सहाय्यक असल्याचे वाटले होते.
मार्च महिन्यांत त्याने त्यांना कॉल करुन त्यांचे चारही दिवाणी दावे निकाली काढण्यासाठी पैशांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी त्याला टप्याटप्याने 74 लाख रुपये दिले होते. ही रक्कम दिल्यानंतरही तो त्यांच्याकडे आणखीन पैशांची मागणी करत होता. मात्र त्यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. याच कारणावरुन त्यांच्यात वाद होऊ लागले होते. यावेळी वैभवने त्यांना पैसे दिले नाहीतर त्यांच्या दिवाणी दाव्याच्या केसचा निकाल त्यांच्या विरोधात लावण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर त्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती, मात्र त्याने त्यांना पैसे दिले नाही. त्यांना प्रतिसाद बंद करुन त्यांचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला होता.
याच दरम्यान वैभवविरुद्ध काही वर्तमानपत्रात फसवुणकीबाबत बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीने त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार सांताक्रुज पोलिसांना सांगून वैभव ठक्करविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली. वैभवविरुद्ध अशाच प्रकारच्या इतर काही गुन्ह्यांची नोंद असून त्याला काही गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याचा ताबा घेतल्यानंतर त्याच्यावर अटकेच कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.