कामावरुन घरी जाणार्‍या तरुणीशी अश्लील चाळे करुन विनयभंग

170 हून अधिक सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 फेब्रुवारी 2026
मुंबई, – कामावरुन घरी जाणार्‍या एका तरुणीशी निर्जनस्थळी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी संतोष कन्हैय्यालाल शर्मा नावाच्या एका 41 वर्षांच्या आरोपीस दिडोंशी पोलिसांनी अटक केली. गुन्हा दाखल होताच कुठलाही पुरावा नसताना दिडोंशी पोलिसांनी परिसरातील 170 हून अधिक सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन आरोपीला 48 तासांत शिताफीने अटक केली आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. संतोष हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून काही महिन्यांपूर्वीच तो मुंबई शहरात नोकरीसाठी आला होता असे पोलीस उपनिरीक्षक नितीन सवणे यांनी सांगितले.

बळीत तरुणी ही गोरेगाव परिसरात तिच्या कुटुंबियंसोबत राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. 31 जानेवारीला ती कामावरुन घरी जात होती. सायंकाळी साडेसात वाजता ती गोरेगाव येथील संतोषनगर, फिल्मसिटी रोडच्या ज्योती कॉम्पलेक्ससमोरील निर्जनस्थळाहून जात होती. याच दरम्यान तिथे आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने तिला पकडले. तिचे तोंड दाबून त्याने तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. यावेळी तिने त्याच्या हाताचा चावा घेऊन स्वतची सुटका करुन आरडाओरड सुरु केला होता.

या आरडाओरडानंतर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळून गेला होता. या प्रकारानंतर ती प्रचंड घाबरली आणि तिने घरी गेल्यानंतर हा प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर त्यांनी तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. काही वेळानंतर ती दिडोंशी पोलीस ठाण्यात आली आणि तिथे उपस्थित पोलिसांना तिने घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. भरस्त्यात घडलेल्या या घटनेची पोलीस उपायुक्त महेश चिमटे, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय भिसे यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांना तपासाचे आदेश देताना आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले होते.

या आदेशानंतर महेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन सवणे, नितीन नंदिले, पोलीस हवालदार रोडे, प्रदीप मोरे, अजीत चव्हाण, पोलीस शिपाई शैलेंद्र भंडारे, अर्जुन सावर्डे आणि सुहास कोळी यांनी तपास सुरु केला होता. ही घटना ज्योती कॉम्प्लेक्सच्या निर्जनस्थळी घडली होती, त्यामुळे तिथे सीसीटिव्ही फुटेज नव्हते. तरीही या पथकाने परिसरातील एकूण 160 ते 170 हून अधिक सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन या गुन्ह्यांतील आरोपी गोकुळधाम परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीनंतर पोलीस उपनिरीक्षक नितीन सवणे व त्यांच्या पथकाने ए. के वैद्य मार्ग, गोकुळधाम परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून संतोष शर्मा याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने बळीत तरुणीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्यांत अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

तपासात संतोष शर्मा हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून तो सात ते आठ महिन्यांपूर्वी उत्तरप्रदेशातून मुंबई शहरात नोकरीसाठी आला होता. गोरेगाव येथे तो एका भाड्याच्या रुममध्ये राहत होता तर याच परिसरातील एका सलूनमध्ये न्हावी म्हणून काम करत होता. त्याला नशा करण्याचे व्यसन होते. गुन्ह्यांच्या दिवशी तो ज्योती कॉम्प्लेक्स परिसरात आला होता. यावेळी त्याने बळीत तरुणीला एकटी असल्याचे पाहून तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याची कबुली दिल्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन सवणे यांनी सांगितले. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page