चारित्र्यावरुन संशयावरुन पत्नीची गळा आवळून हत्येचा प्रयत्न
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत आरोपी पतीला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
8 फेब्रुवारी 2026
मुंबई, – चारित्र्याच्या संशयावरुन एका 27 वर्षाच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना माटुंगा लेबर कॅम्प परिसरात उघडकीस आली आहे. सकिनाबानो दिलशाद अहमद अन्सारी असे या महिलेचे नाव असून तिच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले आहे. याप्रकरणी शाहुनगर पोलिसांनी दिलशाद अहमद सगीर अहमद अन्सारी या 36 वर्षांच्या आरोपी पतीविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना गुरुवारी पहाटे चार वाजता माटुंगा येथील लेबर कॅम्प, मिलिंद नगर परिसरात घडली. याच परिसरात दिलशाद हा त्याची पत्नी सकिनाबानो हिच्यासोबत राहत होता. गेल्या काही दिवसांपासून तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणावरुन त्यांच्यात अनेकदा खटके उडत होते. सतत होणार्या भांडणातून तिने त्याच्याशी बोलणे सोडले होते. त्यात ती त्याला शारीरिक संबंधाला विरोध करत होती. त्याच्या आई-वडिलांशी वाद घालून त्यांच्याासोबत सतत भांडण करत होती. त्याचा त्याच्या मनात प्रचंड राग होता. याच रागातून त्याचे गुरुवारी पहाटे वाद झाला होता. त्यानंतर त्याने तिची हाताने गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
तिचा जीव जात नसल्याने त्याने तिच्या गळ्याभोवती पांढर्या रंगाच्या दोरीने घट्ट आवळून तिला मारण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार स्थानिक रहिवाशांकडून समजताच शाहूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी जखमी झालेल्या सकिनाबानोला पोलिसांनी तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच तिच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. या उपचारानंतर तिला सोडून देण्यात आले होते.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रविण कुंभार यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी पती दिलशाद अन्सारीविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरुन हा प्रकार घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.