बेलोरो पिकअप वाहनाच्या धडकेने सुरक्षारक्षकाचा मृत्यू

अपघातानंतर वाहनचालकाचे घटनास्थळाहून पलायन

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
8 फेब्रुवारी 2026
मुंबई, – भरवेगात जाणार्‍या एका बेलोरो पिकअप वाहनाच्या धडकेने अजय राजेंद्र सिंग या 40 वर्षांच्या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना पवई परिसरात घडली. अपघातानंतर आरोपी वाहनचालक घटनास्थळाहून पळून गेला आहे. त्याच्याविरुद्ध पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.

हा अपघात शनिवारी दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारास पवईतील चांदीवली फार्म रोड, आयआरबी कंपनीजवळील लेक होमजवळ झाला. मिना अजय सिंग ही महिला पवईतील चांदीवली परिसरात राहते. तिचे पती अजय सिंग याच्यासोबत पवईतील हिरानंदानी येथे सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. शनिवारी अजय हे नेहमीप्रमाणे त्यांच्या कामावर निघून गेले होते. दुपारी साडेबारा वाजता मिनाला तिच्या शेजारीच राहणार्‍या सुल्ताना नावाच्या एका महिलेने कॉल करुन तिच्या पतीला एका बेलोरा पिकअप वाहनाने धडक दिली असून अपघातात तिचे पती गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यामुळे त्यांना हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याची माहिती दिली.

या माहितीनंतर ती हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये गेली होती. यावेळी तिला भरवेगात जाणार्‍या एका वाहनाने धडक दिल्याचे समजले. त्यात तिच्या पतीच्या चेहर्‍याला, गळ्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर वाहनचालक वाहन सोडून तेथून पळून गेला होता. दुपारी सव्वाच्या सुमारास तिच्या पतीला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. ही माहिती मिळताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मिना सिंग हिची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी बेलोरो पिकअप वाहनचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने वाहन चालवून तिच्या पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर वाहनचालक पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page