टास्कच्या बहाण्याने साडेदहा लाखांची ऑनलाईन फसवणुक

एपीके फाईलसह बँक खाती पुरविणारा मुख्य आरोपी गजाआड

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
8 फेब्रुवारी 2026
मुंबई, – टास्कच्या बहाण्याने एका 38 वर्षांच्या व्यक्तीची सुमारे साडेदहा लाखांची ऑनलाईन फसवणुकप्रकरणी एका मुख्य संशयित आरोपीस उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. नारायण शंकर माळी असे या आरोपीचे नाव असून त्याला गुजरात येथील दिडेांली परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. नारायणवर फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सायबर ठगाां एपीके फाईलसह बँक खाती पुरविल्याचा आरोप असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

शहजाद सिप्तेन रिझवी हे मालाडच्या मालवणी परिसरात राहत असून ऑस्ट्रेलिया येथील एका जहाजावर कामाला आहेत. जानेवारी महिन्यांत ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना अज्ञात व्यक्तीने एका व्हॉटअप ग्रुपमध्ये अ‍ॅड केले होते. त्यात त्यांना पार्ट टाईम जाँबची ऑफर देऊन विविध टास्कद्वारे घरबसल्या जास्त पैसे कमविण्याची संधी असल्याचे सांगण्यात आले होते. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पैसे मिळत असल्याने त्यांनी ते टास्क पूर्ण करण्याचा निर्णय घेतला होता.

काही टास्क पूर्ण केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात कमिशनची रक्कम जमा झाली होती. त्यानंतर त्यांना एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करुन त्याद्वारे शेअर ट्रेडिंग करुन जास्त कमिशन देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी ते अ‍ॅप डाऊनलोड करुन शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी जानेवारी महिन्यांत 10 लाख 59 हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. मात्र त्यांना मूळ रक्कमेसह कुठलाही परतावा देण्यात आला नाही. या आरोपींनी व्हॉटअप, टेलिग्राम गुपसह बोगस अ‍ॅपद्वारे त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन त्यांची फसवणुक केली होती.

हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी उत्तर सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. तपासात फसवणुकीच सुमारे चार लाखांची रक्कम नारायण माळी याच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. तो सध्या गुजरात येथे वास्तव्यास होता. ही माहिती प्राप्त होताच प्रभारी पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल कांबळे, पोलीस हवालदार विद्याधर पावसकर, पोलीस शिपाई सागर मेघे, गणेश कोरे यांनी गुजरातच्या सुरत, दिडोंली येथून नारायण माळी याला ताब्यात घेतले.

चौकशीत तो मूळचा राजस्थानच्या भिलवाड्याचा रहिवाशी असून गेल्या काही वर्षांपासून गुजरात येथे राहत होता. ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील काही सायबर ठगांच्या तो संपर्कात होता. त्यांच्यासाठी त्याने स्वतसह इतरांना विविध बँक खाती उघडून दिले होते. या बँक खात्यासह एपीके फाईल सायबर ठगांना देऊन त्याने त्यांच्याकडून भरमसाठ कमिशन घेतले होते. तपासात ही माहिती उघडकीस येताच त्याला पोलिसांनी अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणले होते. अटकेनंतर त्याला शुक्रवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page