प्रेमसंबंधातून 19 वर्षांच्या तरुणीची गोळी झाडून हत्या
प्रियकराची चौकशी तर पळून गेलेल्या प्रेयसीचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 फेब्रुवारी 2026
मुंबई, – प्रेमसंबंधातून एका 19 वर्षांच्या तरुणीची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गोवंडी परिसरात उघडकी आला आहे. शिफा शेख असे या हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी तिचा प्रियकर नदीम याला गोवंडी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे तर त्याची प्रेयसी तब्बसूम हिचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. तिनेच शिफावर गोळी झाडल्याचा आरोप आहे. एक फुल दोन माली या वादातून ही हत्या झाल्याचे बोलले जाते.
शिफा शेख ही गोवंडीतील शिवाजीनगर, कमला रमण नगर झोपडपट्टी तिच्या आई-वडिल आणि भावंडासोबत राहत होती. तिची आई गृहिणी असून वडिल बांधकाम कॉन्ट्रक्टर म्हणून काम करतात. याच परिसरात राहणार्या शिफाचे नदीम नावाच्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र नदीम याचे तब्बसूम या महिलेशी प्रेमसंबंध होते. या त्रिकोणी प्रेमसंबंधातून शिफा आणि तब्बस्सूम यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरु होते. मंगळवारी दुपारी बारा वाजता शिफा ही तिच्या घराजवळून जात होती.
दरम्यान तिच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला होता. त्यात तिच्या मानेला आणि गळ्याला गंभीर दुखापत झाली होती. अचानक झालेल्या गोळीबाराच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. शिफाला रक्ताच्या थारोळ्यात पाहताच तिच्या कुटुंबियांनी तिला तातडीने जवळच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. गोळीबाराची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी शिफाच्या कुटुंबियांच्या जबानीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
प्राथमिक तपासात शिफावर तब्बस्सूमने गोळी झाडल्याचे बोलले जाते. गोळीबारानंतर ती पळून गेल्याने तिच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान या हत्येनंतर शिफाचा प्रियकर नदीमला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहे. या गोळीबारामागे प्रेमसंबंध कारणीभूत असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. शिफाचा मृतदेह राजावाडी हॉस्पिटमध्ये पाठविणत आला आहे. तिचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून या मोबाईलची तपासणी सुरु आहे.