फ्लॅट विक्रीतून पार्टनर बंधूंची अडीच कोटीची फसवणुक

दोन पार्टनरविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 फेब्रुवारी 2026
मुंबई, – फ्लॅट विक्रीतून दोन बंधूंची त्यांच्याच दोन पार्टनरने सुमारे अडीच कोटीची फसवणुक केल्याचा प्रकार मुलुंड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपी पार्टनरविरुद्ध नवघर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कमलेश दामजी मिनात आणि प्रेमजी वेलजी पटेल अशी या दोघांची नावे असून याच गुन्ह्यांत त्यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

जेराम जेठा गामी हे 62 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार नवी मुंबईतील वाशी परिसरात राहत असून त्यांचा बिल्डींग कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. 2011 साली त्यांच्यासह त्यांचा भाऊ गोविंद जेठा गामी, कमलेश मिनात आणि प्रेमजी पटेल यांनी अमरदिप कन्स्ट्रक्शन नावाने एक कंपनी सुरु केली होती. कंपनीत प्रत्येकाचा समान हिस्सा होता. 2014 साली त्यांच्या कंपनीने मुलुंड येथील 90 फिट रोडवरील अनुथम या इमारतीच्या प्रोजेक्टचे काम हाती घेतले होते. याच दरम्यान कमलेश आणि प्रेमजी यांनी विक्रोळी येथे कंपनीचे नवीन कार्यालय घेतले होते.

या प्रोजेक्टमधून त्यांना चांगला आर्थिक फायदा होणार होता. त्यामुळे कमलेश आणि प्रेमजी यांनी जेराम आणि गोविंद यांच्यावर सतत दबाव आणण्यास सुरुवात केली होती. त्यांना प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा अनुभव नाही असे सांगून भागीदारीत त्यांचा हिस्सा वाढवून घेतला होता. त्यांच्या दवाबामुळे त्यांनी दोघांनाही प्रत्येकी 33 टक्के तर तक्रारदार जेरामसह गोविंद यांना प्रत्येकी 17 टक्के भागीदारी देण्याचा नवीन करार केला होता. या करारात फ्लॅट खरेदी-विक्रीबाबत नियम आणि अटी निश्चित करण्यात आले होते.

या नियमांचे उल्लघंन करुन ऑगस्ट 2018 ते डिसेंबर 2020 या कालावधीत प्रेमजी आणि कमलेश यांनी तीन फ्लॅटची परस्पर विक्री केली होती. संपूर्ण व्यवहार कॅश स्वरुपात करुन त्यांनी ती रक्कम कंपनीच्या बँक खात्यात जमा न करता त्याचा परस्पर अपहार करुन त्यांच्यासह त्यांच्या भावाची फसवणुक केली होती. या प्रकारानंतर त्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली होती. त्यात कमलेश आणि प्रेमजी यांनी अनुथम या इमारतीमध्ये राजू जाधव, पविण जाधव आणि राणी यांच्यासोबत तीन फ्लॅटचे रजिस्ट्रेशन केले. त्यांच्याकडून 31 लाख 32 हजार 500 रुपये धनादेशद्वारे तर 2 कोटी 55 लाख 68 हजार रुपये कॅश स्वरुपात घेतले.

ही रक्कम कंपनीच्या बँक खात्यात जमा न करता त्याचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केला. अशा प्रकारे या दोघांनी जेराम व त्यांचा भाऊ गोविंद जेराम यांची 2 कोटी 55 लाख 68 हजाराची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी नवघर पोलिसांत दोन्ही पार्टनरविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर कमलेश मिनात आणि प्रेमजी पटेल यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page