ब्लॅकमेल करुन लुटमार करणार्या चारजणांच्या टोळीस अटक
अटक आरोपींमध्ये दोन महिलांसह दोन पुरुषांचा समावेश
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 फेब्रुवारी 2026
मुंबई, – मैत्री करुन भेटण्यासाठी बोलाविलेल्या एका 41 वर्षांच्या व्यक्तीला ब्लॅकमेल करुन लुटमार करणार्या चारजणांच्या एका टोळीस देवनार पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींमध्ये दोन महिलांसह दोन पुरुषांचा समावेश आहे. श्रद्धा अभिजीत जोशी, अनिता रवीशंकर कुशवाह, शिवम रामू माने ऊर्फ तम्मा आणि मलैश बिहारलाल कुरेशी ऊर्फ अजय अशी या चौघांची नावे असून ते चौघेही खारचे रहिवाशी आहेत. त्यांच्याविरुद्ध रॉबरीसह अन्य कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
41 वर्षांचे तक्रारदार मानखुर्द येथे त्यांच्या पत्नी आणि तीन मुलींसोबत राहत असून मानखुर्द येथील एका रेशनिंग दुकानात कामाला आहेत. 28 जानेवारीला त्यांच्या मोबाईलवर एक मिस कॉल आला होता. त्यामुळे त्यांनी कॉल बँक केला असता समोरुन एक महिला बोलत होती. तिने चुकीने कॉल लागला असे सांगितले. त्यानंतर दुसर्या दिवशी तिने पुन्हा त्यांना कॉल केला होता. यावेळी तिने त्यांना त्यांचे फेसबुकवर फोटो पाहिले असून ते खूप छान दिसतात असे सांगून त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ते दोघेही मोबाईलसह व्हॉटअप एकमेकांशी चॅट करत होते. याच दरम्यान तिने तिचे नाव श्रद्धा असल्याचे सांगितले होते. 7 फेब्रुवारीला त्यांच्यात व्हॉटअप चॅट सुरु होते. यावेळी तिने त्यांना भेटण्याचा आग्रह केला होता,
सुरुवातीला त्याने तिला नकार दिला. मात्र तिच्या आग्रहामुळे त्यांनी तिला भेटण्याची तयारी दर्शविली होती. यावेळी तिने तिचा हाफ स्कर्टमधील एक फोटो व्हॉटअपवर पाठविला होता. ठरल्याप्रमाणे ते तिला भेटण्यासाठी गोवंडीतील शिवाजीनगर सिग्नलजवळील जायका हॉटेलसमोर गेले होते. रात्री साडेनऊ वाजता तिथे श्रद्धा आी होती. ते दोघेही रस्त्याच्या बाजूला गप्पा मारत होते. काही वेळानंतर त्यांनी तिला बिर्याणी पार्सल घेतली होती. याच दरम्यान तिथे एक महिला आणि दोन पुरुष आले. या तिघांनी श्रद्धाची छेड काढतोस काय असे सांगून त्याला शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान श्रद्धाने महिलेला त्यांनी तिला हॉटेलमध्ये येतेस का अशी विचारणा करुन रडण्याचे नाटक सुरु केले होते. त्यानंतर या तिघांनी त्यांना बेदम मारहाण करुन त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देऊन त्यांच्या खिशातून दहा हजाराची कॅश काढली.
ही कॅश घेतल्यानंतर ते चौघेही तेथून पळून गेले होते. या प्रकारामुळे ते प्रचंड घाबरले होते. त्यामुळे पोलिसांत तक्रार न करता ते त्यांच्या घरी निघून गेले होते. हा प्रकार त्यांनी त्यांच्या मित्राला सांगितला. त्याने त्यांना पोलिसांत तक्रांर करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी दुसर्या दिवशी घडलेला प्रकार देवनार पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी दोन महिलांसह चारही आरोपीविरुद्ध रॉबरीसह ब्लॅकमेल करुन शिवीगाळ करुन मारहाण करणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच श्रद्धा जोशी, अनिता कुशवाह, शिवम माने आणि मलैश कुरेशी या चौघांनाही खार येथून पोलिसांनी अटक केली. तपासात चारही आरोपी खार येथे राहतात. श्रद्धा ही घरकाम करते तर अनिता ही गृहिणी आहे. शिवम आणि मलैश हे दोघेही मजुरीसह इतर लहानसहान काम करतात. झटपट पैशांसाठी त्यांनी हा गुन्हा केल्याचे तपासात उघडकीस आले.
अटकेनंतर या चौघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या चौघांची चौकशी सुरु असून त्यांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.