लोकल प्रवासादरम्यान चौदा वर्षांच्या मुलीचा विनयभंग

गुन्हा दाखल होताच 35 वर्षांच्या आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 फेब्रुवारी 2026
मुंबई, – कुर्ला-डोबिवली लोकल प्रवासादरम्यान एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच मोहम्मद आयुब अन्सारी नावाच्या एका 35 वर्षांच्या आरोपीस कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने 22 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या वृत्ताला कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी दुजोरा दिला आहे.

बळीत चौदा वर्षांची मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत डोबिवली येथे राहते. मंगळवारी 10 फेब्रुवारीला तिच्या वडिलांचा वाढदिवस होता. त्यामुळे ती तिच्या आई-वडिलांसोबत गेटवे ऑफ इंडिया येथे फिरायला आली होती. तिथे काही वेळ घालविल्यानंतर त्यांनी एकत्र जेवण केले. पावणेनऊ वाजता ते तिघेही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कर्जत फास्ट लोकलने डोबिवलीला जाण्यासाठी निघाले होते. ही लोकल कुर्ला रेल्वे स्थानकात येताच आरोपी लोकलमध्ये चढला. बळीत मुलगी बसलेल्या जागी तो उभा होता. यावेळी त्याने दोन वेळा तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता.

मात्र गर्दीमुळे तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. डोबिवली रेल्वे स्थानक जवळ येताच ती तिच्या आई-वडिलांसोबत गेटजवळ उभी होती. यावेळी आरोपी तिच्या मागे आला. त्याने मागून तिला अश्लील स्पर्श करुन पुन्हा तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारानंतर तिने त्याच्या जोरात कानशिलात लगावली होती. तिच्या आई-वडिलांनी विचारणा केल्यानंतर तिने आरोपीने तिच्याशी कुर्ला ते डोबिवली रेल्वे स्थानकादरम्यान वारंवार अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग केल्याचे सांगितले. या प्रकारानंतर तिच्या वडिलांसह इतर प्रवाशांनी त्याला ताब्यात घेतले होते. डोबिवली रेल्वे स्थानक येताच त्याला रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते.

याप्रकरणी बळीत मुलीने घडलेला प्रकार रेल्वे पोलिसांना सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपी मोहम्मद आयुबविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. हा प्रकार कुर्ला रेल्वे स्थानकानंतर घडल्याने त्याचा तपास कुर्ला रेल्वे पोलिसांकडे सोपविण्यात आला होता. या गुन्ह्यांचे कागदपत्रे हाती येताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांच्या पथकाने आरोपी मोहम्मद आयुबला अटक केली.

अटकेनंतर त्याला बुधवारी विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला 22 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपी हा कुर्ला येथे राहत असून गोवंडीतील एका कपड्याच्या कारखान्यात कामाला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page