क्षुल्लक वादातून रागाच्या भरात 23 वर्षांच्या तरुणाची हत्या
हत्येनंतर पळून गेलेल्या मारेकर्याला 36 तासात अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 फेब्रुवारी 2026
मुंबई, – क्षुल्लक वादातून रागाच्या भरात हर्ष तुषार ठाकूर नावाच्या एका 23 वर्षांच्या तरुणाची तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या करण्यात आल्याची घटना भांडुप परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या मारेकर्याला अवघ्या 36 तासांत रोहित कचरु खरात या आरोपीस जालना येथून कांजूरमार्ग पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला हॉलिडे कोर्टाने शनिवार 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली ओ. हर्ष ठाकूर हा आरोपी रोहितच्या रागाचा बळी ठरला आहे, क्षुल्लक वादातून राग अनावर न झाल्याने रोहितने हर्षची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी दुजोरा दिला आहे.
ही घटना शनिवारी रात्री सव्वाच्या सुमारास भांडुप येथील मेनन कॉलेजवळील नाल्याजवळ घडली. तुषार गोपीनाथ ठाकूर हे चालक म्हणून काम करत असून सध्या नाहूरच्या प्रशांत सागर सहकारी सोसायटीमध्ये राहतात. हर्ष हा त्यांचा मुलगा आहे असून तो सध्या काहीच कामधंदा करत नव्हता. शनिवारी रात्री हर्ष हा त्याचे मित्र ओमकार आणि नितीनसोबत मेनन कॉलेजवळील नाल्याजवळ गप्पा मारत होते. यावेळी तिथे तोंडओळख असलेल्या रोहित आला होता. त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला आणि या वादातून त्याने हर्षला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली होती. त्यामुळे त्यानेही त्याला धक्का मारला होता. त्याचा राग आल्याने रोहितने त्याच्याकडील तिक्ष्ण हत्याराने हर्षवर वार केले होते. त्यात त्याच्या छातीला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली होती.
या हल्ल्यानंतर रोहित तेथून पळून गेला होता. रक्तबंबाळ झालेल्या हर्षला त्याच्या मिांनी तातडीने जवळच्या फोर्टिज हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निकम व त्यांच्या पथकाने धाव घेतली होती. याप्रकरणी तुषार ठाकूर यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रोहितविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या हत्येची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपीच्या अटकेचे कांजूरमार्ग पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर पोलीस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत, सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कांजूरमार्ग, पंतनगर, नवघर, विक्रोळी, पार्कसाईट आणि घाटकोपर पोलिसांच्या निवडक अधिकारी आणि कर्मचार्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने रोहितचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना तो मुंबईतून पळून गेल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. तो जालना येथे असल्याची माहिती मिळताच एक टिम तिथे पाठविण्यात आली होती. या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दाभाडे, पोलीस उपनिरीक्षक ओमासे, पोलीस शिपाई शेलार, अनासरे यांनी जालना येथील बदलापूर परिसरातून रोहितला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने अचानक झालेल्या भांडणाचा राग अनावर झाला आणि त्याने हर्षची तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली. त्याची हत्या करण्याचा त्याचा उद्देश नव्हता. मात्र रागावर नियंत्रण नसल्याने त्याच्या हातून हर्षची हत्या झाल्याचे सांगितले. या कबुलीनंतर त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते.
हत्येच्या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला रविवारी दुपारी हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निकम, पोलीस निरीक्षक अमोल कडू, विष्णू आव्हाड, गणेश्वर शेट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पाडुळे, दाभाडे, पोलीस उपनिरीक्षक ओमासे, मिथुन पाटील, राजूपत, पोलीस हवालदार किशोर चव्हाण, पोलीस शिपाई शेलार, अनासरे यांनी केली. हत्येनंतर रोहितने त्याचा मोबाईल बंद ठेवला होता. तो सतत त्याचे राहण्याचे ठिकाण बदलत होता. तरीही हत्येचा गुन्हा दाखल होताच अवघ्या 36 तासांत पोलिसांनी हत्येचा पर्दाफाश करुन मुख्य आरोपी रोहित याला अटक केली.