वयोवृद्धांच्या बँक खात्यातून पावणेदहा लाखांचे ऑनलाईन व्यवहार
बॅक खात्याची कुठलीही माहिती शेअर नसताना फसवणुक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
18 फेब्रुवारी 2026
मुंबई, – एअर इंडियातून निवृत्त झालेल्या एका वयोवृद्ध जोडप्याच्या बँक खात्यातून अज्ञात सायबर ठगाने ऑनलाईन सुमारे पावणेदहा लाख रुपयांचा व्यवहार केल्याचा प्रकार सांताक्रुज परिसरात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे त्यांनी कोणालाही त्यांच्या बँक खात्यासह पासवर्ड तसेच इतर कोणतीही माहिती शेअर केली नसताना ही ऑनलाईन फसवणुक झाली आहे. याप्रकरणी सांताक्रुज पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
सोली कैकूश्रू दस्तूर हे 76 वर्षांचे वयोवृद्ध त्यांची पत्नीसोबत सांताक्र्रुज येथे राहते. तेदोघेही एअर इंडियामध्ये नोकरीस होते. सध्या ते दोघेही निवृत्त झाले आहे. या दोघांचे खार येथील एका बँकेत संयुक्त बँक खाते आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांनी एका खाजगी कंपनीची एफडी केली होती. या एफडीची रक्कम अलीकडेच त्यांच्या बँक खात्यात जमा झाली होती. मंगळवारी 17 फेब्रुवारीला सकाळी पाच वाजता ते झोपेतून उठले होते. यावेळी त्यांना बँकेचे काही मॅसेज प्राप्त झाले होते. त्यामुळे त्यांनी ऑनलाईन बँकेच्या अॅप उघडून त्यांच्या खात्याची पाहणी केली होती. त्यात त्यांना त्यांच्या बँक खात्यातून काही ऑनलाईन व्यवहार झाल्याचे दिसून आले.
या ऑनलाईन व्यवहारामुळे त्यांच्या खात्यातून पावणेदहा लाख रुपये डेबीट झाले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली. यावेळी त्यांच्या बँक खात्यात वेगवेगळ्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे बँक अधिकार्यांनी सांगितले. त्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती, पासवर्ड तसेच इतर कोणतीही माहिती कोणालाही शेअर केली नव्हती. तरीही त्यांच्या बँक खात्यातून संबंधित ऑनलाईन व्यवहार झाले होते. यावेळी बँकेच्या अधिकार्यांनी त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता.
त्यामुळे त्यांनी सांताक्रुज पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा सांताक्रुज पोलीस ठाण्याच्या सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरु आहे. ज्या बँक खात्यात संबंधित रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या बँक खात्यासह खातेदाराची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.