कुरार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षकाला अटक
फसवणुकीसह लैगिंक अत्याचारात गुन्ह्यांत मदत करण्यासाठी लाचेची मागणी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 फेब्रुवारी 2026
मुंबई, – पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पोलीस उपनिरीक्षकाला एक लाख रुपयांच्या लाचप्रकरणी मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव बळीराम तावडे आणि पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर गोविंदराव जुने अशी या दोघांची नावे आहेत. फसवणुकीसह लैगिंक अत्याचाराच्या गुन्हयांत कारवाई न करण्यासाठी तसेच मदत करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे तीन लाखांची लाचेची मागणी करुन त्यापैकी दोन लाखांचा हप्ता स्विकारला होता तर उर्वरित एक लाखांची लाचेची रक्कम घेताना या दोघांवर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यातच वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षकाच्या अटकेने तिथे उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती. या कारवाईनंतर संजीव तावडे व ज्ञानेश्वर जुने यांच्या राहत्या घरी कारवाई करण्यात आली होती, या कारवाईचा तपशील समजू शकला नाही.
काही दिवसांपूर्वी तक्रारदाराविरुद्ध कुरार पोलीस ठाण्यात फसवणुकीची एक तकार आली होती. या तक्रारीची शहानिशा सुरु असताना 22 जानेवारी 2026 रोजी तक्रारदाराच्या भावाने त्यांच्याविरुद्ध लैगिंक अत्याचाराची तक्रार केली होती. या दोन्ही तक्रारीचा तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जुने यांच्याकडे होता. याच गुन्ह्यांत त्यांनी तक्रारदारांना चौकशीसाठी बोलाविले होते. चौकशीदरम्यान ज्ञानेश्वर जुने यांनी त्यांच्याविरुद्ध आलेल्या दोन्ही प्रकरणे मिटविण्यासाठी, त्यांना गुन्ह्यांत मदत करण्यासाठी तसेच त्यांच्यविरुद्ध कारवाई न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी त्यांना दोन लाख रुपये दिले होते.
मात्र उर्वरित एक लाख रुपयांच्या लाचेसाठी ज्ञानेश्वर जुने हे त्यांना सतत कॉल करत होते. लाचेची रक्कम दिली नाहीतर त्यांच्यावर कारवाईची धमकी देत होते. ही लाच त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे यांच्या वतीने मागितली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचेची रक्कम देण्याची तयारी दर्शवून संजीव तावडे आणि ज्ञानेश्वर जुने यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. 3 फेब्रुवारीला ही तक्रार प्राप्त होताच या अधिकार्यांनी त्याची शहानिशा केली होती. यावेळी संजीव तावडे आणि ज्ञानेश्वर जुने यांनी तक्रारदाराकडून फसवणुकीसह लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यांत तीन लाखांची मागणी करुन दोन लाख रुपये घेतल्याची कबुली दिली तसेच उर्वरित एक लाखांची मागणी केल्याचे उघडकीस आले होते.
या घटनेनंतर बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका विशेष पथकाने कुरार पोलीस ठाण्यात सापळा लावला होता. यावेळी एक लाख रुपयांची लाचेची रक्कम घेताना ज्ञानेश्वर जुने यांना या अधिकार्यांनी रंगेहाथ अटक केली. त्यांच्या चौकशीत संजीव तावडे यांचा सहभाग उघडकीस आला होता, त्यामुळे त्यांनाही नंतर या गुन्ह्यांत अटक करण्यात आली. अटकेनंतर या दोघांनाही विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांच्या अटकेनंतर दुसर्या टिमने संजीव तावडे आणि ज्ञानेश्वर जुने यांच्या राहत्या घरी कारवाई केली होती. या कारवाईबाबत पोलिसांकडून काहीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
यापूर्वी सप्टेंबर 2025 रोजी वडाळा टी टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुधाकर सरोदे आणि पोलीस उपनिरीक्षक राहुल रमेश वाघमोडे यांना तर मे 2025 रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव मधुकर देशमुख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली होती. या दोन्ही घटना ताज्या असताना आता कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस संजीव तावडे आणि उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जुने यांच्यावर या अधिकार्यांनी कारवाई केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील, गणपत परचाके व अन्य पोलीस पथकाने केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजीत सुळे यांनी सांगितले.