बारा लाखांच्या ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील आरोपीस अटक

बॉसच्या मुलीच्या नावाने मॅसेज पाठवून अपहार केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – सुमारे बारा लाखांच्या ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील इस्तियाक अहमद शेख या आरोपीस पश्‍चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. इस्तियाजवर फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा आरोप असून त्याने उघडलेल्या बँक खात्यात इतर गुन्ह्यांतील लाखो रुपयांची रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्यावर बॉसच्या मुलीच्या नावाने मॅसेज पाठवून कंपनीच्या हेड अकाऊंटटची फसवणुक केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

३८ वर्षांचे तक्रारदार विश्‍वनाथ दिनेश धाडवे हे त्यांच्या कुटुंबियांसोबत कल्याण येथे राहतात. सध्या ते अंधेरीतील जे. बी नगर परिससरात असलेल्या ज्वेल प्लास्ट कंपनीत अकाऊंट हेड म्हणून काम करतात. कंपनीचे मालक वसंत बाफना असून ही कंपनी प्लास्टिक प्रोडेक्टची मॅन्यूफॅक्चररिंगचे काम करते. कंपनीत एकूण चार कर्मचारी असून अकाऊंट विभागाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. कंपनीच्या आर्थिक व्यवहारासाठी वसंत बाफना यांची स्वाक्षरी अधिकृत करण्यात आली आहे. त्यांच्याशी बोलून विश्‍वनाथ धाडवे हे सर्व बिलांसह इतर आर्थिक व्यवहार करतात. वसंत यांची नेहा नावाची मुलगी असून तिचा मोबाईल क्रमांक त्यांनी नेहाजी ज्वेल प्लास्ट असा सेव्ह केला आहे. १४ ऑक्टोंबरला दुपारी साडेबारा वाजता त्यांना नेहाचा एक व्हॉटअप मॅसेज आला होता. त्यात तिने कंपनीच्या अकाऊंटमध्ये किती बॅलेन्स रक्कम आहे याबाबत विचारणा केली होती. यावेळी त्यांनी बारा लाखांची रक्कम शिल्लक असल्याचे सांगितले.

काही वेळानंतर त्यांना पुन्हा नेहाने मॅसेज करुन एक बँक खाते पाठवून त्या खात्यात ही रक्कम तातडीने ट्रान्स्फर करण्यास सांगितले. नेहा ही मालकाची मुलगी असल्याने त्यांनी तिचा मॅसेज समजून संबंधित बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर केली होती. काही वेळानंतर त्यांना नेहाचा मॅसेज आला होता. त्यामुळे त्यांनी तिला कॉल करुन या व्यवहाराची माहिती दिली. ही माहिती ऐकल्यानंतर तिने त्यांना कुठलाही मॅसेज आला नाही, कुठल्या बँक खात्याची माहिती दिली नसून त्यात बारा लाख रुपये ट्रान्स्फर करण्यास सांगितले नाही असे सांगितले. ही माहिती ऐकल्यानंतर त्यांना धक्काच बसला होता. त्यांच्यासोबत अज्ञात व्यक्तीने फसवणुक केल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने सायबर हेल्पलाईनसह पश्‍चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांना ही माहिती सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरु होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी इस्तियाक शेख याला संशयित आरेापी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याच्याच बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. त्यानेच फसवणुकीसाठी बँक खाते उघडून त्याची माहिती गुन्ह्यांतील मुख्य सायबर ठगांना दिली ाहेती. ही रक्कम त्यांना टा्रन्स्फर केल्यानंतर त्याला काही रक्कम कमिशन म्हणून मिळाल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्याने उघडलेल्या बँक खात्यात इतर फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर झाली होती.

तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंंतच्या तपासात इस्तियाकविरुद्ध अशाच इतर काही गुन्ह्यांची नोंद असून त्याच्यावर यापूर्वी फसवणुकीच्या गुन्ह्यांत अटकेची कारवाई झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page