लग्नाचे आमिष दाखवून महिलेचे कॅशसहीत दागिने घेऊन पलायन
पळून गेलेल्या आरोपीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 फेब्रुवारी 2026
मुंबई, – लग्नाचे आमिष दाखवून, कपडे खरेदीच्या बहाण्याने मॉलमध्ये आणून एका महिलेचे मोबाईल, कॅश आणि विविध सोन्याचे दागिने असा साडेचार लाखांचा मुद्देमाल घेऊन आरोपीने पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जतिन चौहाण आरोपीविरुद्ध वनराई पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. तक्रारदार महिलेशी एका लग्न जुळविणार्या संकेतस्थळावरुन ओळख झाल्याने त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती, तिला नवीन कपडे घेऊन देण्याचा बहाण्याने नत्रक्ष मॉलमध्ये आणून तिचा मोबाईल, कॅश आणि दागिने पळविल्याचे पोलिसांनी सांगितले.
45 वर्षांची तक्रारदार महिला गोरेगाव येथे राहत असून ती एका खाजगी कंपनीत कामाला आहे. तीन महिन्यांपूर्वी तिने लग्न जुळविणार्या एका संकेतस्थळावर लग्नासाठी स्वतची प्रोफाईल अपलोड केली होती. ही प्रोफाईल पाहिल्यानंतर तिला एक महिन्यांपूर्वी जतीन चौहाण या व्यकत्ीने रिक्वेस्ट पाठवली होती. ती रिक्वेट तिने स्विकारली होती. यावेळी त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले होते. त्यानंतर ते दोघेही व्हॉटअपसह कॉलवर एकमेकांच्या संपर्कात होते. त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. मात्र दिल्लीत राहणार्या आईची प्रकृती खराब असल्याने लग्नाविषयी बोलणी करण्यासाठी त्याचे कुटुंबिय नंतर मुंबईत येतील असे सांगून त्याने तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता.
17 फेब्रुवारीला ती त्याच्यासोबत गोरेगाव येथे सिनेमा पाहण्यासाठी गेली होती. मात्र सिनेमा न आवडल्याने ते दोघेही अर्धवट सिनेमा सोडून निघून गेले होते. त्यानंतर ते दोघेही तिच्या घरी आले होते. काही वेळाने तिची बहिण घरी आली होती. यावेळी तिने जतिनला त्याच्या कुटुंबियाविषयी माहिती विचारणा केली होती. त्याने त्याचे कुटुंबिय दिल्लीतील करोलबागचे रहिवाशी असून त्यांचा मुंबईसह दिल्लीत कपड्याचे कारखाने असल्याचे सांगितले होते. काही वेळानंतर त्याने तिला कपडे खरेदीच्या बहाण्याने बाहेर आणले होते. मात्र गोरेगाव येथील ओबेरॉय येथे न जाता ते दोघेही अंधेरी येथे आले. तिथे नास्ता केल्यानंतर ते दोघेही त्यांच्या घरी निघून गेले.
19 फेब्रुवारीला त्याने तिला कॉल करुन ओबेरॉय मॉल येथे बोलाविले होते. त्यामुळे ती त्याला भेटण्यासाठी घरातून निघाली होती. यावेळी तिने तिचे सोन्याचे दागिने पॉलिश करण्यासाठी घेतले होते. दागिने पॉलिश करण्यासाठी त्याने तिला क्राफर्डेमार्केट येथे आणले होते. तिथेच त्याने तिच्यासाठी एक बॅग खरेदी केली. त्यात त्याने तिला मोबाईलसह कॅश आणि सोन्याचे दागिने ठेवण्यास सांगितले. त्यानंतर ते दोघेही मंगलदास मार्केटमध्ये कपडे खरेदीसाठी गेले होते. तिथे चेजिंग रुम नव्हते, त्यामुळे तो तिला दादर येथील नक्षत्र मॉल येथे घेऊन आला होता. तिथे काही कपडे घेतल्यानंतर ती ट्रायल रुममध्ये गेली होती. यावेळी तिने तिची बॅग जतिनकडे दिली होती. ट्रायल रुममध्ये नवीन कपडे घालून ती बाहेर आली असता तिला जतीन दिसला नाही.
तिने त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे तिने दुकानदाराच्या मोबाईलवरुन त्याला कॉल केला, मात्र त्याचा मोबाईल बंद येत होता. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिचा विश्वास संपादन केला, तिला नवीन कपडे खरेदी करुन देतो असे सांगून मॉलमध्ये आणून तिच्या बॅगेतील मोबाईलसह दहा हजाराची कॅश आणि विविध सोन्याचे दागिने असा साडेचार लाखांचा मुद्देमाल घेऊन तो पळून गेला होता. हा प्रकार उघडकीस येताच तिने घडलेला प्रकार वनराई पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी जतीन चौहाण याच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मॉलसह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या जतीनचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.