वांद्रे टर्मिनस स्थानकात 13.83 कोटीचा चरसचा साठा जप्त
अज्ञात व्यक्तीविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 फेब्रुवारी 2026
मुंबई, – गोरखपूर-मुंबई या अवध एक्सप्रेस या गाडीतून आणलेल्या चरस तस्करीचा वांद्रे रेल्वे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. वांद्रे रेल्वे टर्मिनस रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिसांनी 13 कोटी 83 लाख रुपयांचा चरसचा साठा जप्त केला आहे. हा साठा कोणी आणला याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध वांद्रे रेल्वे पोलिसांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेजवरुन पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत. चालू वर्षांत इतक्या मोठ्या चरसचा साठा पकडण्याची रेल्वे पोलिसांनी ही पहिलीच कारवाई आहेत.
शनिवारी सव्वाचार वाजता गोरखपूर येथून मुंबईतील वांद्रे रेल्वे टर्मिनस स्थानकात गोरखपूर-मुंबई ही गाडी फलाट क्रमांक चारवर आली होती. यावेळी रेल्वे पोलीस संशयित प्रवाशांसह त्यांच्या सामानाची तपासणी करत होते. यावेळी रेल्वे पोलिसांना जनरल डब्ब्यात एक संशयित बॅग सफाई कर्मचार्याच्या लक्षात आली. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने ही माहिती रेल्वे पोलिसांना दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रेल्वे पोलिसांसह रेल्वे पोलीस फोर्स, फ्रॉरेन्सिक टिम आणि श्वान पथकाने पंचनामा करुन ती बॅग ताब्यात घेतली होती.
या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्यांना 31 पॅकेट सापडले. या पॅकेटमध्ये उच्च प्रतीचे चरस होते. या चरसचे वजन 13 किो 834 ग्रॅम असून आंतरराष्ट्रीय बाजारात चरसची किंमत 13 कोटी 83 लाख 40 हजार रुपये इतकी आहेत. हा चरस गोरखपूर येथून मुंबईत पाठविण्यात आला होता. मात्र ती बॅग घेण्यासाठी कोणीही रेल्वे स्थानकात आले नाही किंवा रेल्वे स्थानकातील पोलीस बंदोबस्त पाहिल्यानंतर अज्ञात व्यक्तीने ती बॅग जनरल डब्ब्यात ठेवून पलायन केले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे.
याप्रकरणी वांद्रे रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तपास करत आहेत. चरस विक्री करणारी ही आंतरराज्य टोळी असल्याचा प्राथमिक अंदाज असून या टोळीशी संबंधित आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.