मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 फेब्रुवारी 2026
मुंबई, – एकाच बाईकवरुन चौघेजण प्रवास करताना पकडल्यानंतर भरस्त्यात एका पोलीस हवालदाराशी हुज्जत घालून धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय सहिता कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच चारही तरुणांना समतानगर पोलिसांनी अटक केली आहे. प्रेम नवनाथ वाघमारे, सागर गौरव मगर, अक्षय रमेश गायकवाड आणि आनंद विनोद जोगदंड अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या चारही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलिसांशी वाद घालणे या चारही तरुणांना चांगलेच महागात पडल्याचे बोलले जाते.
गोविंद अर्जुन सांगळे हे बोरिवली येथे राहत असून सध्या समतानगर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी 18 फेब्रुवारी त्यांची रात्रपाळी होती, त्यामुळे ते रात्री आठ वाजता पोलीस ठाण्यात हजर झाले होते. रात्री उशिरा ते त्यांच्या शासकीय बाईकवरुन परिसरात गस्त घालत होते. कांदिवलीतील स्टेशन रोड, आदर्श ज्यूससमोर गस्त घालत असताना त्यांना एका बाईकवरुन चारजण जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी बाईकस्वाराला थांबवून त्याच्याकडे लायसनसची मागणी केली. एका बाईकवरुन चारजण प्रवास करत होते, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे सांगून त्यांनी त्यांना पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. यावेळी मागे बसलेल्या तीन तरुणांनी त्यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांच्याशी अरेरावी भाषा सुरु करुन धक्काबुक्की करुन त्यांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता.
तुम्ही आम्हाला पोलीस ठाण्यात नेता कसे तेच बघतो अशी धमकी दिली. यावेळी त्यांनी त्यांना त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार असून सहकार्य करण्यास सांगितले. तरीही या चौघांनी तिथे प्रचंड गोंधळ घालून मोबाईलवरुन शूटींग करण्यास सुरुवात केली. तुम्हाला जे फाईन मारायचे आहे ते इथेच मारा, आम्ही पोलीस ठाण्यात येणार नाही असा पवित्रा घेतला होता. यावेळी त्यांनी त्यांच्याकडे पावती नसून तुम्हाला पोलीस ठाण्यात यावे लागेल असे सांगितले. मात्र त्यांनी पोलीस ठाण्यात येण्यास नकार देत त्यांना शिवीगाळ करुन पुन्हा धक्काबुक्की केली होती. त्यांची बाईक बंद केली होती. वातावरण तंग झाल्याने गोविंद सांगळे यांनी समतानगर मोबाईल व्हॅनला कॉल करुन घडलेला प्रकार सांगितला. काही वेळानंतर तिथे पोलीस आले होते.
यावेळी गोविंद सांगळे यांच्याशी वाद घालून, शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणणार्या चारही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलीस ठाण्यात आणल्यांनतर या चौघांविरुद्ध पोलिसांनी गोविंद सांगळे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच प्रेम वाघमारे, सागर मगर, अक्षय गायकवाड आणि आनंद जोगदंड या चौघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर चौघांनाही गुरुवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती.