बोरिवलीतील ज्वेलर्स व्यापार्‍याला तीस लाखाच्या खंडणीसाठी धमकी

अज्ञात व्यक्तीकडून खंडणीसाठी लॉरेन्स बिष्णोईच्या नावाचा वापर

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 फेब्रुवारी 2026
मुंबई, – विलेपार्ले येथील ज्वेलर्स व्यापार्‍याला लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या नावाने खंडणीसाठी धमकी आल्याची घटना ताजी असताना आता बोरिवलीतील एका ज्वेलर्स व्यापार्‍याला अशाच प्रकारे तीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने खंडणीसाठी लॉरेन्स बिष्णोईच्या नावाचा वापर केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बोरिवली पोलिसांनी खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा संमातर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तपास करत आहेत.

यातील तक्रारदार जोगेश्वरी येथे राहत असून बोरिवलीतील एका ज्वेलर्स शॉपमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. बुधवारी 18 फेब्रुवारीला शॉपच्या मोबाईल क्रमांकावरुन एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन एक मॅसेज आला होता. त्यात लॉरेन्स बिष्णोईच्या नावाचा वापर करुन अज्ञात व्यक्तीने ज्वेलर्स व्यापार्‍याकडे तीस लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. खंडणीची रक्कम दिली नाहीतर बाबा सिद्धीकीप्रमाणे तुमची हत्या घडवून आणू. त्यामुळे 24 तासांत खंडणीची रक्कम दिली नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली होती. या प्रकारानंतर त्यांनी ज्वेलर्स मालकांना ही माहिती दिली.

दुसर्‍या दिवशी सकाळी सव्वाअकरा वाजता याच मोबाईलवर पुन्हा अज्ञात व्यक्तीने व्हॉटअप कॉल करुन खंडणीची मागणी केली होती. तुम्ही अजूनही पैशांची व्यवस्था केली नाही. तुमचाही बाबा सिद्धीकी करावा लागेल असे सांगून संबंधित रेकॉडिंग कोणालाही पाठवायचे असेल तर पाठवा. तुम्हाला बोरिवलीत कोणीही वाचवू शकणार नाही असे सांगून फोन कट केला. त्यानंतर त्याच व्यक्तीने तुम्हाला लवकरच गोळ्या घालणार, वाट पहा असा मॅसेज पाठविला होता. सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र सलग दोन दिवस लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने खंडणीसाठी धमकी आल्यानंतर ज्वेलर्स मालक प्रचंड घाबरले होते.

21 फेब्रुवारीला ज्वेलर्स मालक त्यांच्या दुकानात आले होते. यावेळी त्यांना पुन्हा अज्ञात व्यक्तीने कॉल करुन खंडणीसाठी धमकी दिली होती. यावेळी त्यांनी त्यांना एक लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. यावेळी त्याने दहा लाखांची मागणी करुन पैसे दिले नाहीतर गोळी खाण्यासाठ तयार रहा असे सांगितले. त्यांनी दहा लाख रुपये देणे शक्य नसल्याने त्याला चार लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. त्याने त्यांना एक लाख रुपये जीपे तर उर्वरित रक्कम बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास सांगितले. यावेळी त्यांनी त्याला बँक खात्यात पैसे पाठविण्याची व्यवस्था करतो असे सांगितले.

घडलेल्या प्रकारामुळे ज्वेलर्स व्यापारी प्रचंड घाबरले होते. त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. घडलेला प्रकार बोरिवली पोलिसांना सांगून त्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी विलेपार्ले येथील एका ज्वेलर्स व्यापार्‍याला अशाच प्रकारे खंडणीसाठी धमकी देण्यात आली होती.

अज्ञात व्यक्तीने खंडणीसाठी लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या नावाचा वापर केला होता. याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल होताच मुख्य आरोपीसह पाचजणांना पोलिसांनी अटक केली होती. ही घटना ताजी असताना आता बोरिवलीतील ज्वेलर्स व्यापार्‍याला लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने तीस लाखांच्या खंडणीसाठी धमकी दिली आहे. या गुन्ह्यांचा बोरिवली पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page