मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 फेब्रुवारी 2026
मुंबई, – जुन्या वादातून दोन तरुणांवर चारजणांच्या एका टोळीने तिक्ष्ण हत्यारासह लाथ्याबुक्यांनी मारहाण झाल्याचा प्रकार माहीम हार्बर लाईनवर घडली. या हल्ल्यात मल्लेश धनगर आणि व्यकंटेश राजू नायक हे दोघेही जखमी झाल्याने त्यांच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. पोटात चाकूने वार झाल्याने मल्लेशची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जाते. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या चारही आरोपींना वडाळा रेल्वे पोलिसांनी अटक केली. अभिषेक सुधीर जाधव, बॉबी अनिल वाघ, रोहन पटेकर ऊर्फ कंट्या आणि मनोज हिरालाल गुप्ता ऊर्फ चना अशी या चौघांची नावे असून अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजता माहीम येथील हार्बरलाईन पटरी क्रमांक सहाजवळ घडली. व्यकंटेश हा माटुुंगा येथील लेबर कॅम्प, सिद्धार्थनगरात राहत असून सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतो. त्याचे वडिल चालक आहे तर आई घरकाम करते. काही दिवसांपूर्वी त्याचे इरफान नावाच्या एका तरुणासोबत क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. यावेळी इरफानने त्याला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली होती. त्यामुळे त्याने इरफानविरुद्ध शाहूनगर पोलिसांत तक्रार केली होती. सोमवारी रात्री साडेनऊ वाजता व्यकंटेश हा त्याचा मित्र मल्लेश याच्यासोबत हार्बरलाईन पटरी क्रमांक सहाजवळ होता. यावेळी तिथे अभिषेक, बॉबी, कंट्या आणि चना असे चौघेजण होते.
त्यांनी इरफानसोबतचा जुना वाद काढून त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यातून या चौघांनी मल्लेशला चाकूने भोसकले तर व्यकंटेशला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. या हल्ल्यात ते दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मल्लेशवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळताच शाहू नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
यावेळी रुग्णालयात उपचार घेणार्या व्यकंटेशची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या जबानीनंतर पोलिसांनी अभिषेक जाधव, बॉबी वाघ, कंट्या आणि चना या चौघांविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. ही घटना माहीम हार्बर लाईनवर ही घटना घडल्याने या गुन्ह्यांचा तपास नंतर वडाळा रेल्वे पोलिसांकडे सोपविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी रेल्वे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंखे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. ए शेटे, पोलीस हवालदार वर्पे, ठोंबरे, पोलीस शिपाई वाडकर, वडणे यांनी वेगवेगळ्या परिसरातून चारही आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनी जुन्या वादातून मल्लेश आणि व्यकंटेश यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची कबुली दिली होती. या कबुलीनंतर या चौघांना पोलिसांनी अटक करुन लोकल कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.