गंमत म्हणून मेट्रो लिफ्टमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

गितांजली एक्सप्रेसमधून पळून गेलेल्या आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ जून २०२६
मुंबई, – गंमत म्हणून एका सतरा वर्षांच्या मुलीचा कांदिवलीतील डहाणूकरवाडी मेट्रो स्थानकातील लिफ्टमध्ये विनयभंग करुन पळून गेलेल्या डोनी सरकार नावाच्या आरोपीस कांदिवली पोलिसांनी अटक केली. गुन्हा दाखल होताच तो गिताजंली एक्सप्रेसमधून त्याच्या रायपूर येथील गावी पळून गेला होता, मात्र सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने त्याची ओळख पटवून त्याला स्थानिक रेल्वे पोलिसांच्या मदतीने कांदिवली पोलिसांनी अटक केली. ट्रान्झिंट रिमांडवर त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले आहे. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

सतरा वर्षांची बळीत मुलगी ही कांदिवली परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहत असून सध्या एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेते. शुक्रवारी २९ मेला सकाळी पावणेबारा वाजता ती फलाट क्रमांक एकवर जाण्यासाठी डहाणूकरवाडी मेट्रो स्थानकाच्या लिफ्टमधून जात होती. याच दरम्यान तिच्या मागे डोनी लिफ्टमध्ये शिरला. लिफ्टमध्ये कोणीही नसल्याची संधी साधून त्याने तिच्याशी अश्‍लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. या घटनेनंतर तो तेथून पळून गेला. घरी गेल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला. तिच्या तक्रारीनंतर कांदिवली पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस आयुक्त निता पाडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक करण सोनकवडे, पोलीस निरीक्षक शेखर भिडे, स्वप्निल घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत गिते, श्रीकांत मगर, पोलीस उपनिरीक्षक नितीन साटम, नारायण खाडे, प्रमोद दळवी, अंमलदार झोपडे, पिंजारे, शिंदे, माळी, सांगळे, जोगडपुरे, केदार, आदित्य राणे यांनी तपास सुरु केला होता. डहाणूकरवाडी मेट्रो रेल्वे स्थानकातील ७० हून अधिक सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करुन आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. या फुटेजवरुन आरोपीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले होते.

तपासात आरोपी हा दादर रेल्वे स्थानकातून गितांजली एक्सप्रेसमधून पळून जात असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर या पथकाने स्थानिक रेल्वे पोलिसांच्या मदतीने डोनी सरकार या ४० वर्षांच्या संशयिताला रायपूर येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच गंमत म्हणून बळीत मुलीशी अश्‍लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याची कबुली दिली.

डोनी हा मूळचा कोलकाताचा रहिवाशी असून सध्या तो कांदिवलीतील चारकोप परिसरात एका भाड्याच्या रुममध्ये राहतो. तो कडीमाकाम करतो. मिळेल तिथे तो कामासाठी जातो आणि तिथे राहत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ट्रान्झिंट रिमांडवर त्याला नंतर मुंबईत आणण्यात आले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला दिडोंशीतील पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page