२२ वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या पिटाच्या आरोपीला अटक

जामिनावर बाहेर येताच पळून गेला होता

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ जून २०२६
मुंबई, – पिटाच्या गुन्ह्यांत जामिनावर बाहेर आल्यानंतर पळून गेलेल्या एका वॉण्टेड आरोपीस ओशिवरा पोलिसांनी अटक केली. राजेंद्र शिवराम शिंदे असे या ४९ वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी माझगाव येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. सुनावणीसाठी सतत गैरहजर राहत असल्याने त्याच्याविरुद्ध कोर्टाने अजामिनपात्र वॉरंट जारी केले होते, अखेर २२ वर्षांनी त्याला पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले.

२००४ रोजी अंधेरी परिसरात सुरु असलेल्या एका सेक्स रॅकेटचा ओशिवरा पोलिसांनी पर्दाफाश केला होता. याच गुन्ह्यांत राकेश शिंदे याला पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी काही तरुणींची सुटका केली होती. याप्रकणी ओशिवरा पोलिसांनी भारतीय दंड सहिता आणि पिटाच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर राजेंद्रला पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत असताना त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. यावेळी कोर्टाने त्याला जामिन मंजूर केला होता. मात्र जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता. तो खटल्याच्या सुनावणीसाठी सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कोर्टाने अजामिनपात्र अटक वॉरंट जारी करताना त्याच्या अटकेचे आदेश ओशिवरा पोलिसांना दिले होते.

या आदेशांनतर त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. चौकशीदरम्यान तो ज्या सोसायटीमध्ये राहत होता, ती सोसायटी पुर्नविकासामध्ये गेली होती. त्यानंतर तो कुठे गेला याबाबत कोणाला काहीच माहिती नव्हती. याच दरम्यान त्याने त्याच्या रुमची विक्री केली होती. त्यामुळे तो सध्या कुठे राहतो याबाबत पोलिसांना काहीच माहिती मिळत नव्हती. तरीही पोलिसांनी त्याचा शोध सुरु ठेवला होता. ही शोधमोहीम सुरु असताना राजेंद्र हा विलेपार्ले परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार बाविस्कर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनिल साळुंखे, पोलीस हवालदार महेश साळोखे, पोलीस शिपाई महेंद्र भोये यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून राजेंद्रला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

चौकशीत तोच अजामिनपात्र अटक वॉरंट बजाविण्यात आलेला आणि गेल्या २२ वर्षांपासून पोलिसांना सतत गुंगारा देणारा आरोपी असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. तपासात जामिनावर बाहेर येताच तो त्याच्या रायगड येथील गावी निघून गेला होता. तिथे तो शेती करत होता. अलीकडेच तो त्याच्या मुलाच्या घरी राहण्यासाठी आला होता. ही माहिती प्राप्त होताच त्याला २२ वर्षांनी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी माझगाव येथील कोर्टात हजर करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page