बाहेरचे जेवण देण्यास नकार दिला म्हणून पोलीस शिपायाला मारहाण
सायन हॉस्पिटलमधील घटनेने तणाव; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ जून २०२६
मुंबई, – आयसीयूमध्ये उपचार घेणार्या पत्नीसाठी बाहेरचे जेवण देण्यास नकार दिला म्हणून शंकर किसन पुकळे या ३३ वर्षांच्या पोलीस शिपायाला शिवीगाळ करुन बेदम मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार सायन हॉस्पिटलमध्ये घडला. याप्रकणी किताबअली मोहम्मद सत्तार शेख या आरोपीविरुद्ध कर्तव्यावरील पोलीस शिपायाला मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याच्यावर कारवाई करुन नंतर नोटीसवर सोडून देण्यात आले आहे.
ही घटना बुधवारी ३ मेला रात्री साडेबारा वाजता सायन हॉस्पिटलच्या आययीयू वॉर्ड क्रमांक सात/अ मध्ये घडली. शंकर पुकळे हे नवी मुंबईतील कामोठे परिसरात राहत असून सध्या आरसीएफ पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. रविवारी चेंबूर परिसरात राहणार्या किताबअली व त्याची पत्नी रुक्सार बानू यांच्यात कौटुंबिक वाद झाला होता. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती प्राप्त होताच आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी भांडण करणार्या पती-पत्नीला पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणले होते. रात्री दोघांची समजूत काढून त्यांना घरी पाठविण्यात आले होते.
घरी येताच रात्री उशिरा तिने बाथरुममध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे किताबअलीने रुक्सारला तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. तिच्या सुरक्षेकामी तिथे शंकर पुकळे आणि रसिका आंग्रे यांना बंदोबस्तकामी ठेवले होते. १ जूनला रात्री साडेबारा वाजता किताबअली हा त्याच्या पत्नीला बाहेरचे जेवण घेऊन आला होता. यावेळी शंकर पुकळे यांनी त्याला आयसीयूमधील रुग्णांना बाहेरचे जेवण देण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे. त्यामुळे त्याला ते जेवण आतमध्ये नेता येणार नाही असे सांगितले.
बुधवारी रात्री शंकर पुकळे आणि रसिका आंग्रे हे आयसीयू वॉर्डबाहेर कर्तव्य बजावत होते. यावेळी तिथे किताबअली पुन्हा पत्नीला बाहेरचे जेवण घेऊन आला होता. त्यामुळे त्यांनी त्याला जेवण देण्यास मनाई केली होती. याच कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाबाचाची झाली होती. रागाच्या भरात त्याने कॉलर पकडून त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली होती. त्यात त्यांच्या गळ्याला आणि उजव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली होती. तुला आता बघूनच घेतो अशी किताबअली हा धमकी देत असल्याने तिथे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हा प्रकार त्यांनी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला सांगितला. तयनंतर तिथे सायन पोलीस ठाण्यातील पोलीस पथक आले होते. यावेळी किताबअलीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी शंकर पुकळे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याच्यावर अटकेची कारवाई दाखवून त्याला नंतर नोटीस देऊन सोडून देण्यात आले होते.