मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 फेब्रुवारी 2026
मुंबई, – हत्येच्या गुन्ह्यांत विशेष सेशन कोर्टाने स्टॅडिंग वॉरंट बजाविलेल्या एका वॉण्टेड आरोपीस भायखळा पोलिसांनी अटक केली. मोहम्मद सत्तार ऊर्फ सलीम अब्दुल दोरजीवाला असे या आरोपीचे नाव असून जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता. या कालावधीत तो ओरिसा, विशाखापट्टणम, आंधप्रदेश मासे विक्रीचे काम करत होता. अलीकडेच तो मुंबईत आला आणि त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
सलीम दोराजीवाला हा माझगाव येथील सलीम मेंशन इमारतीमध्ये राहत होता. 1982 साली तो त्याचा मित्र इब्राहिम मालवला याच्यासोबत माझगाव येथील जीएसटी भवन, पेट्रोलपंपाजवळील एका देशी दारुच्या अड्ड्यावर गेला होता. तिथे त्याचे सदानंद शेट्टी यांच्याशी क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादातून रागाच्या भरात त्याने सदानंद शेट्टी यांच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करुन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी भायखळा पोलिसांनी सलीम दोराजीवाला आणि इब्राहिम मालवला यांच्या हत्येविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या या दोघांनाही पोलिसांनी अटक केली होती. दोन वर्ष कारागृहात राहिल्यानंतर सलीमला विशेष सेशन कोर्टाने जामिन मंजूर केला होता. जामिनावर बाहेर येताच सलीम हा पळून गेला होता. तो खटल्याच्या सुनावणीसाठी सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कोर्टाने स्टॅडिंग वॉरंट जारी करताना भायखळा पोलिसांच्या त्याच्या आदेश दिले होते. या आदेशानंतर सलीमचा पोलिसांकडून शोध सुरु केला होता. मात्र प्रत्येक वेळेस तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जात होता. ही शोधमोहीम सुरु असताना सलीम हा भायखळा परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीनंतर सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोपान काकड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक नरुटे, मुलाणी, सहाय्यक फौजदार गोंविलकर, पोलीस हवालदार मांजरेकर यांनी भायखळा येथील परब चौक, अफझल माऊ हॉटेलजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. शुक्रवारी तिथे सलीम आला होता, यावेळी त्याला पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी शिताफीने अटक केली.
पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याची पोलिसांनी चौकशी केली असता तो मुंबईतून पळून गेल्यानंतर काही वर्ष ओरिसा, विशाखापट्टणम, आंधप्रदेशात वास्तव्यास होता. तिथेच तो मासे विक्री करत होता. काही दिवसांपूर्वी तो मुंबईत आला होता. तेव्हापासून तो पायधुनीतील अली उमर स्ट्रिट परिसरात राहत होता. कामासाठी तो भायखळा परिसरात आला होता. ही माहिती मिळताच त्याला तब्बल 42 वर्षांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत त्याला विशेष सेशन कोर्टात हजर केले जाणार आहे.