डिलीव्हरीच्या 59 लाखांचे हिरे घेऊन कारचालकाचे पलायन
चालकासह मित्राविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 मार्च 2026
मुंबई, – मुंबईतील विविध ज्वेलर्स व्यापार्यांना डिलीव्हरीसाठी दिलेल्या सुमारे 59 लाख रुपयांचा हिर्यांचा कंपनीच्या कारचालकाने मित्राच्या मदतीने अपहार केल्याची घटना वांद्रे परिससरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी भावेशकुमार अशोककुमार प्रजापती व त्याच्या अज्ञात मित्राविरुद्ध बीकेसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा बीकेसी पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.
मितुल प्रकाश पटेल हे हिरे व्यावसायिक असून त्यांच्या कुटुंबियांसोबत चर्नीरोड परिसरात राहतात. त्यांची एस. एम स्कियुअर लॉजिस्टिक नावाची एक कंपनी असून या कंपनीत त्यांच्यासोबत प्रकाश पटेल आणि हितेंद्र पटेल नावाचे दोन मित्र पार्टनर आहेत. कंपनीचे मुख्य कार्यालय चर्नीरोड येथील ऑपेरा हाऊस, पंचरत्ना इमारतीमध्ये तर वांद्रे येथील बीकेसी येथे कंपनीची एक शाखा आहे. चर्नीरोडच्या कार्यालयातून त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार चालतात. ही कंपनी मुंबई ते सुरत आणि सुरत ते मुंबई येथे हिरे, सोने, सोन्याचे दागिने डिलीव्हरीचे काम करते. 26 फेब्रुवारीला त्यांच्या कार्यालयात सुरतच्या एच. के ज्वेल्सने काही पार्सल पाठविले होते. ते पार्सल त्यांना मुंबईतील विविध ज्वेलर्स व्यापार्यांना डिलीव्हरी करायचे होते. त्याची जबाबदारी त्यांनी कंपनीचे कर्मचारी विष्णूभाई पटेल, अनिरुद्ध राठोड, किशन राठोड आणि चालक भावेशकुमार यांच्यावर सोपविली होती.
ठरल्याप्रमाणे त्यांनी एच. के ज्वेल्स कंपनीच्या बीकेसी येथील 46 पार्सल दिले होते. त्यानंतर त्यांना अंधैरीतील कंपनीच्या कार्यालयात इतर पार्सल द्यायचे होते. मात्र बीकेसी येथील कार्यालयात आल्यानंतर भावेशकुमार कंपनीची कार तसेच इतर सहा पार्सल घेऊन निघून गेला होता. बराच वेळ होऊन तो परत आला नव्हता. हा प्रकार संशयास्पद वाटताच या कर्मचार्यांनी ही माहिती मितुल पटेल यांना दिली होती. त्यामुळे त्यांनी मोबाईल अॅपमध्ये कारचे लोकेशन पाहिले असता ती कार वांद्रे येथील एका बॅकेजवळ असल्याचे दिसून आली. कारमधील सीसीटिव्ही फुटेजचे पाहिल्यानंतर भावेशकुमार हा त्याच्या एका मित्रासोबत हिर्यांचे सहा पार्सल घेऊन जाताना दिसला होता.
या सहा पार्सलमध्ये 69 लाख 74 हजार 473 रुपयांचे वेेगवेगळे हिरे होते. भावेशकुमारने त्याच्या मित्रासोबत हिर्यांचा अपहार करुन तेथून पलायन केले होते. त्यामुळे मितुल पटेल यांनी घडलेला प्रकार बीकेसी पोलिसांना सांगून भावेशकुमार आणि त्याच्या अज्ञात मित्राविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ते दोघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.