कांदिवलीतील लक्ष्मीनारायण मंदिरात चोरी करणारा गजाआड
चोरीच्या दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ जून २०२६
मुंबई, – कांदिवलीतील लक्ष्मीनारायण मंदिरातील दानपेटीतील कॅश चोरी करुन पळून गेलेल्या एका आरोपीस कांदिवली पोलिसांनी अटक केली. अरमान ऊर्फ अल्ताफ नाजीर शेख असे या आरोपीचे नाव असून त्याचा दुसरा सहकारी धर्मेश लोहार हा फरार आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. अरमान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या अटकेने एमएचबी आणि अंधेरी पोलीस ठाण्यातील दोन चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
विपुलभाई काकूभाई जेटालिया हे व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत कांदिवलीतील प्रफुल्ल सोसायटीमध्ये राहत५ात. याच परिसरातील एम. जी रोडवर लक्ष्मीनारायण मंदिर आहे. १३ मेला रात्री साडेआठ वाजता नेहमीप्रमाणे मंदिर बंद झाले होते. यावेळी रात्रीच्या वेळेस अज्ञात व्यक्तींनी मंदिरात प्रवेश करुन दानपेटीतील सुमारे साठ हजार रुपयांची कॅश चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार दुसर्या दिवशी सकाळी सहा वाजता उघडकीस आला. मंदिारातील दानपेटीतील कॅश चोरट्याने पळविल्याने स्थानिक भाविकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी विपुलभाई जेटालिया यांच्या तक्रारीवरुन कांदिवली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. याच फुटेजवरुन त्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु होते.
याच दरम्यान या गुन्ह्यांतील आरोपी कांदिवलीतील गणेशनगर, एकतानगर खाडीजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त निता पाडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक करण सोनकवडे, पोलीस निरीक्षक शेखर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन साटम, पोलीस हवालदार प्रविण जोपले, राजेंद्र गौतम, पोलीस शिपाई स्वप्निल जोगलपुरे, प्रविण वाघमारे, सुधीर नादकर, राणे तसेच सायबर कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कादबाने आदी पथकाने अरमान शेख याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यानेच धर्मेश लोहारच्या मदतीने लक्ष्मीनारायण मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. ते दोघेही मालाडच्या मालवणी परिसरात राहत असून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. अरमानविरुद्ध दोन मंदिरातील चोरीसह बाईक चोरी, अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अटकेने एमएचबी पोलीस ठाण्यातील मंदिरासह अंधेरीतील वाईन शॉपच्या दोन चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.