अज्ञात व्यक्तीच्या हत्येचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश

हत्येनंतर पळून गेलेल्या दोघांना मुंबईसह हरियाणा येथून अटक

0

अरुण सावरटकर
11 मार्च 2026
मुंबई, – फेब्रुवारी महिन्यांत गोरेगाव परिसरात मृतावस्थेत सापडलेल्या एका अज्ञात व्यक्तीची हत्या झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघड होताच या हत्येचा कुठलाही पुरावा नसताना पर्दाफाश करण्यात वनराई पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या दोन्ही मारेकर्‍यांना मुंबईसह हरियाणा येथून पोलिसांनी अटक केली. शिशिपाक संशोराम सिंग आणि राजेश रमेश नाथ अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. भंगार विक्रीच्या पैशांतून झालेल्या वादातून त्यांनी त्यांच्याच सहकारी मित्राची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने यांनी सांगितले.

24 फेब्रुवारी 2026 रोजी गोरेगाव येथील हनुमान टेकडी, मेट्रो पिलर क्रमांक 7/388 जवळ पोलिसांना एक तरुण बेशुद्धावस्थेत सापडला होता. ही माहिती स्थानिक रहिवाशांकडून मिळताच वनराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या व्यक्तीला उपचारासाठी जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल नंतर पोलिसांना प्राप्त झाला होता. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. डोक्यात जड वस्तूने मारहाण करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे वनराई पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

या हत्येची अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त महेश चिमटे, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय भिसे यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी हत्येनंतर पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु केला होता. मृत व्यक्तीची ओळख पटली नव्हती. त्यामुळे त्याची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले होते. तपासादरम्यान पोलिसांनी मृत व्यक्ती कचरा वेचून उपजिवीका करणारा असल्याचे समजले. त्यामुळे गोरेगाव ते दहिसर परिसरातील 50 ते 70 हून अधिक कचरा वेचणार्‍या व्यक्तींची पोलिसांनी चौकशी केली होती. त्यांना मृत व्यक्तीचे छायाचित्र दाखविण्यात आले. त्यातून पोलिसांना मृत व्यक्तीचे नाव अजहर असल्याचे तसेच तो सुरेश कालिया आणि सलीम ऊर्फ नेपाळी यांच्यासोबत कचरा वेचण्याचे काम करत असल्याचे समजले होते. मात्र अजहरच्या हत्येनंतर ते दोघेही अचानक गायब झाले होते. दोन दिवसांत या दोघांना कोणीही पाहिले नव्हते.

हाच धागा पकडून पोलिसांनी त्यांची जास्तीत जास्त माहिती काढण्याचे काम सुरु केले होते. त्यात सुरेश ऊर्फ कालिया ऊर्फ शिशिपाक सिंग हा हरियाणा येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने, पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र पोस्टुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषारे, राठोड, पोलीस उपनिरीक्षक वनवे, भिसे, वाघमोडे, तळेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिसाळ, पोलीस हवालदार धनू, पालवे, येवले, राणे, बागवे, पोलीस शिपाई नवलू यांनी हरियाणा येथील कैथल, कलायत परिसातून सुरेश ऊर्फ कालियाला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने राजेश नाथ ऊर्फ सलीम ऊर्फ नेपाळी याच्या मदतीने अजहरची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर या पथकाने मालाड येथील पठाणवाडी परिसरातून सलीम ऊर्फ नेपाळी याला अटक केली. या दोघांच्या चौकशीत दोन्ही आरोपी अजहरसोबत कचरा वेचण्याचे काम करत होते. भंगार विक्रीतून मिळालेल्या पैशांवरुन त्यांच्यात प्रचंड वाद झाला होता. याच वादातून त्यांनी अजहरची डोक्यात दगड घालून हत्या केली होती.

या हत्येनंतर ते दोघेही पळून गेले होते. या हत्येचा कुठलाही पुरावा नसताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने यांच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत हत्येचा पर्दाफाश करुन दोन्ही मारेकर्‍यांना अटक केली. याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसाकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page