केमिकलच्या सहाय्याने दुप्पट रक्कमेच्या आमिषाने घातला गंडा
सात लाखांची कॅश पळविणार्या दोघांना उत्तरप्रदेशातून अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 मार्च 2026
मुंबई, – केमिकलच्या सहाय्याने दुप्पट रक्कम करुन देतो असे सांगून एका व्यक्तीकडील सात लाख रुपयांची कॅश घेऊन पळून गेलेल्या दोन भामट्यांना बांगुरनगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने उत्तरप्रदेशातून अटक केली. पवन ऊर्फ प्रकाशकुमार दिलीपप्रसाद गुप्ता आणि राजसिंह मोहनसिंह प्रसाद अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी आहे. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने शनिवार 14 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ललन राजकुमार महतो हे 34 वर्षाचे तक्रारदार गोरेगाव येथे राहतात. त्यांचा स्वतचा व्यवसाय आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांची वसईतील साक्षी इंटरप्रायजेस या दुकानाचे मालक असलेल्या प्रकाश सर आणि त्यांचा सहकारी पवन या दोघांशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते तिघेही चांगले मित्र झाले होते. त्यांच्याकडून त्यांना कामाचे पैसे येणे बाकी होते. त्यामुळे ते त्यांच्या भावासोबत डिसेंबर 2025 रोजी पवन सरकडे पैसे घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी एकत्र मद्यप्राशन केले होते. तिथेच पवन आणि प्रकाशने त्यांच्यासमोरच एका कागदाच्या तुकड्याला केमिकल लावले होते. ते केमिकल लावून त्यांनी पाचशे रुपयांची नोट तयार केली होती. त्यांनी त्यांना त्यांच्याकडील रक्कम दुप्पट करुन देण्याचे आश्वासन दिले होते.
काही दिवसांनी त्यांनी त्यांना कॉल करुन त्यांच्याकडे सात लाख रुपये असल्याचे सांगितले होते. त्यापैकी काही रक्कमेची त्यांनी व्यवस्था केली होती तर उर्वरित रक्कम त्यांच्या मित्रांकडून उधारीने घेतले होते. दुप्पट रक्कम झाल्यानंतर त्यांनी त्यांना ही रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. ठरल्याप्रमाणे 12 फेब्रुवारीला पवन हा त्यांच्या घरी आला होता. त्यानंतर ते दोघेही दुप्पट रक्कम करण्यासाठी लागणारे साहित्य विकत घेण्यासाठी डिमार्टला गेले होते. सामान घेऊन ते सर्वजण त्यांच्या घरी आले. थोड्या वेळाने तिथे प्रकाश सर आले. ते दोघेही घरातच दुप्पट रक्कमेचा प्रयोग करणार होते, त्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीसह मुलांना बाहेर पाठविले होते.
ते बाहेर गेल्यानंतर त्यांनी त्यांना सात लाखांची कॅश दिली होती. यावेळी त्यांनी केमिकल काढून पैशांवर लावली. खाकी रंगाच्या सेलो टेपने पॅक करुन त्याचे दोन पुडके टॉवेलमध्ये गुंडाळून त्यांच्याकडे दिले. त्यानंतर ते दोघेही त्यांच्या घरातून निघून गेले. थोड्या वेळाने त्यांनी टॉवेल उघडले असता त्यात फक्त कोरे कागद होते, दुप्पट रक्कम नव्हती. दुप्पट रक्कमेचे आमिष दाखवून ते दोघेही त्यांच्याकडील सात लाखांची कॅश घेऊन पळून गेले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बांगुरनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी पवन आणि प्रकाश सर नावाच्या दोन्ही आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन आरोपींचा शोध सुरु केला होता. तपासादरम्यान ते दोघेही बिहार आणि उत्तरप्रदेशात पळून गेल्याचे उघडकीस आले होते. त्यांच्या अटकेसाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज दळवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय सरोळकर, भदरगे, पोलीस शिपाई दळवी, गावीत व अन्य पोलीस पथकाला तिथे पाठविण्यात आले होते. या पथकाने उत्तरप्रदेशच्या गाजीपूर, कोतवाली परिसरातून राजसिंह आणि प्रकाशकुमार या दोघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्यांना अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टाने शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील प्रकाशकुमार हा बिगारी कामगार असून राजसिंह हा काहीच कामधंदा करत नाही. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.