आर्थिक मदतीची बतावणी करुन लुटमार करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

खार येथून दोघांना अटक तर इतर पाचजणांचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ जून २०२६
मुंबई, – व्यवसायात आर्थिक मदत करतो असे सांगून घातक शस्त्रांचा धाक दाखवून लुटमार करणार्‍या एका टोळीचा खार पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दोन आरोपींना खार येथून पोलिसांनी अटक केली. संजय दशरथ म्हात्रे आणि शक्तीकुमार रामशिश सिंह अशी या दोघांची नावे असून ते दोघेही ठाण्यातील रहिवाशी आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एक बोगस पोलीस आयकार्ड व महाराष्ट्र पोलीस असलेले लिहिलेले आयकार्ड जप्त केले आहे. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला आहे. त्यात जोएब शब्बीर सय्यद, राजन मुथ्थूस्वामी तेवर, गणेश भवन, इम्रान शेख ऊर्फ जिग्नेश जितेंद्र आणि पांडे यांचा समावेश आहे. ते सर्वजण पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

४२ वर्षांचे शुभारकर नारायण सालियन हे कांदिवली परिसरात राहत ते हॉटेलचे मटैरियल सप्लायर्स म्हणून काम पाहतात. तसेच ते जमिनीच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करतात. पंधरा दिवसांपूर्वी कांदिवली-चर्चगेट असा रेल्वेने प्रवास करताना त्यांची जितेंद्र नावाच्या एका व्यक्तीशी ओळख झाली होती. या ओळखीत त्याने तो अनेकांना त्यांच्या व्यवसायासाठी आर्थिक मदत करत असल्याचे सांगितले होते. यावेळी त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले होते. ही माहिती त्यांनी त्यांचा मित्र कासिम शेख यांना दिली होती. त्यामुळे त्यांनी जितेंद्रकडे व्यवसायासाठी आर्थिक मदत मागण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी त्याला संपर्क साधला असता जितेंद्रने त्यांना आधी पाच लाख रुपये डिपॉझिट करण्यास सांगितले. ही रक्कम डिपॉझिट होताच त्यांना दहा लाखांची आर्थिक मदत करण्याचे आश्‍वासन दिले होते. यावेळी त्यांनी पाच लाख रुपये डिपॉझिट करणे शक्य नसल्याचे सांगून पन्नास हजार देण्याचे आश्‍वासन दिले होते.

ठरल्याप्रमाणे शुभारकर सालियन हे कासिम शेख यांच्यासोबत शनिवारी दुपारी चार वाजता खार येथे गेले होते. यावेळी जितेंद्र व त्याच्या सहकार्‍यांनी त्यांच्याकडील कॅश असलेली बॅग खेचण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एकाने चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली होती. याच दरम्यान तिथे काही लोक जमा झाले. यावेळी त्यापैकी एकाने तो पोलीस असल्याचे सांगून पोलीस आयकार्ड दाखविले. मात्र त्यांच्यावर संशय आल्याने या लोकानंी दोघांना ताब्यात घेतले तर इतर तीनजण कारमधून पळून गेले. ही माहिती मिळताच खार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या दोघांना नंतर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

चौकशीत त्याचे नाव संजय म्हात्रे आणि शक्तीकुमार सिंह असल्याचे उघडकीस आले. ते दोघेही ठाण्यातील रहिवाशी असून शक्तीकुमारकडे पोलिसांना पोलिसांचे बोगस आयकार्ड सापडले. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून संजयविरुद्ध विनोबा भावे नगर आणि शिवडी पोलीस ठाण्यात तोतयागिरीसह कट रचून फसवणुक केल्याचे दोन तर शक्तीकुमारविरुद्ध निर्मलनगर पोलीस ठाण्यात अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही टोळी व्यवसायात आर्थिक मदत करते असे सांगून डिपॉझिटसाठी पैसे आणण्यास सांगून संबंधित व्यक्तींना घातक शस्त्रांचा धाक दाखवून लुटमार करत असल्याचे उघडकीस आले.

हा प्रकार उघडकीस येताच आरोपीविरुद्ध पोलिसानी भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर संजय म्हात्रे आणि शक्तीकुमार सिंह या दोघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page