मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 मार्च 2026
मुंबई, – पश्चिम उपनगरातील एका नामांकित बिल्डरला अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या नावाने खंडणीसाठी धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अलीकडेच एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कारच्या डिक्कीजवळ एक धमकीवजा इशारा देणारे पत्र आणि जिवंत काडतुस ठेवून पलायन केले होते. त्यामुळे पत्रासह जिवंत काडतुस ठेवणार्या व्यक्तीच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध सुरु असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्याने बोलताना सांगितले.
वैभव सोमा बावकर हे त्यांच्या कुटुंबियांसोबत नालासोपारा येथे राहतात. गेल्या आठ वर्षांपासून ते अंधेरी येथे राहणार्या एका बिल्डरकडे सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. या बिल्डरची एक खाजगी कंपनी असून कंपनीचे मुख्य कार्यालय अंधेरीतील विरा देसाई रोडवर आहे. गेल्या पाच महिन्यांपासून बिल्डर हे वांद्रे येथील पाली हिल येथे राहतात. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना छोटा शकीलकडून खंडणीसाठी धमकी दिली जात होती. या धमकीनंतर त्यांनी गुन्हे शाखेत त्यांना खंडणीसाठी धमकी येत असल्याची तक्रार केली होती. या धमकीनंतर त्यांनी वैभव बावकरसह इतर तीन खाजगी सुरक्षारक्षकांना कामावर ठेवले होते.
6 मार्चला वैभव बावकरसह इतर सुरक्षारक्षक, दोन वाहनचालक कामावर हजर झाले होते. दुपारी पाऊणच्या सुमारास ते त्यांच्या घरातून अंधेरीतील कार्यालयात जाण्यासाठी निघाले होते. काही वेळानंतर ते वर्सोवा मेट्रो स्टेशनजवळील बांधकाम साईटवर आले होते. कार्यालयात गेल्यानंतर त्यांनी वैभवला कारमधून गिफ्ट आणण्यास सांगितले. त्यामुळे तो गिफ्ट आणण्यासाठी गेला होता. यावेळी त्याला कारच्या डिक्कीजवळ एक पिशवी गुंडाळून ठेवल्याचे दिसून आले. त्यात त्याच्या मालक बिल्डरचे नाव होते. या पिशवीत एक पत्र होते. त्यात त्यांना धमकीवजा इशारा देण्यात आला होता.
छोटा शकीलच्या नावाने अज्ञात व्यक्तीने त्यांच्याकडे पुन्हा खंडणीची मागणी केली होती. त्यात एक जिवंत काडतुस होते. ही माहिती नंतर वैभव बावकरने त्याच्या मालकाला सांगितली. या माहितीनंतर ते सर्वजण वर्सोवा पोलीस ठाण्यात आले. घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगून त्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी देणे, शस्त्र अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान या धमकीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला संमातर तपास करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुटेजवरुन धमकीच्या पत्रासह जिवंत काडतुस ठेवणार्या व्यक्तीचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.